Tuesday, December 27, 2022

३० डिसेंबर १९७५ ची ती रात्र

२६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणिबाणी ला आता जवळपास सहा महिने झाले होते. आणिबाणी म्हणजे काय हे समजण्याचे खरं म्हणजे त्या वेळी माझं वय नव्हतं ! मी केवळ १२ वर्षां चा होतो ! 


इतकेच लक्षात आले होते की, देशातील अनेक मोठ्या नेत्यांना इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकले आहे, संघावर बंदी घातली आहे आणि मुख्य म्हणजे आपली संघाची अभिमन्यू सायं शाखा बंद पडली आहे. संघ शाखेत जाऊन भगवा ध्वज लावला तर पोलिस पकडतात म्हणे... 

संघ शाखेत जाणा-या बळीराम पेठेतील बहुतेक घरांमधील मोठ्या माणसांना पोलिसांनी अटक करून धुळे, नासिक, पुणे येथील तुरुंगात ठेवले होते. घरी नियमितपणे येणाऱ्या सा. विवेक आणि पुणे तरुण भारत मध्ये ही सेन्सॉरशिप मुळे या बातम्या प्रसिद्ध होत नव्हत्या. देशभरात दडपशाही सुरू होती. या सगळ्या गोष्टींची मनातल्या मनात चिड येत होती.  

तशातच राजू साठे ने निरोप आणला... आपल्या अभिमन्यू सायं शाखेतील मुलांनी भिंतीवर घोषणा लिहायच्या आहेत. आपण लहान मुले असल्याने पोलिस आपल्या ला पकडणार नाही, फार तर फार दोन रट्टे मारतील आणि आरडाओरडा करून हाकलून देतील. आमच्या शाखेचे मुख्य शिक्षक श्री. घन:श्याम जोशी यांच्या निरोपा नुसार आम्ही - मी, राजू ( रघुपती ) साठे, सुनील कुलकर्णी व त्याचा धाकटा भाऊ चारुदत्त कुळकर्णी अशा चौघांनी खडू, गेरू, कोळसा यांचा उपयोग करून भिंतीवर घोषणा लिहायच्या असे ठरले !

कोणत्या घोषणा लिहायच्या ? तर - आणिबाणी रद्द करा, मीसा बंदी मुक्त करा, संघावरील बंदी उठवा, भारत माता की जय !

कुणी ही घरी सांगायचे नाही आणि उद्या ३० डिसेंबर ला रात्री ८ ते १० या वेळात काम फत्ते करायचे असे आम्ही आदल्या दिवशी म्हणजे २९ ला ठरवले. 

३० तारीख उजाडली आणि कुलकर्णी बंधुंचे आजोबा वारल्या मुळे त्या दोघे जणांना आई- वडीलांसोबत तातडीने बाहेर गावी जावे लागले.

पण साठे आणि माझा निर्णय पक्का झाला होता.

३० डिसेंबर ला रात्री ९ च्या सुमारास आम्ही दोघेच कडाक्याच्या थंडीत खाकी चड्डी च्या खिशात खडू, कोळसा आणि गेरु चे खडे घेऊन मोहिमेवर निघालो.

त्या काळात डिसेंबर च्या थंडीत रात्री ९ वाजता सामसूम होत असे. रस्त्यावर अजिबात वर्दळ नसलेल्या बळीराम पेठेत आम्ही दोघेच ठरलेला मजकूर भिंतीवर लिहीत या गल्लीतून पुढच्या गल्लीत जात होतो. 

अंधारात आपल्या ला कुणी ही पहात नाही या समजुतीत आम्ही निर्धास्त होतो. पण... पण.. का कुणास ठाऊक कुणी तरी आपल्या मागावर आहे अशी शंका यायला लागली !

एक सायकलस्वार सारखा ठिकठिकाणी थांबून लांबून आमचे निरीक्षण करत होता. त्याला झुकांडी देऊन निसटण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने आमच्या वर झडप घातली, ' कारे काय करताय रे केव्हा पासून पाहतोय, कोण रे तुम्ही ? शिव्यांची लाखोली सुरू...

एका हातात सायकल चे हॅंडल आणि दुस-या हाताने आमच्या शर्टाची काॅलर पकडून त्याने आम्हाला हल्ली च्या बळीराम पेठेतील संघ कार्यालया जवळ च्या तत्कालीन काट्याफैल पोलिस चौकी त आणले. तीथल्या दोन पोलिसांनी सायकल वर बसवून, आम्हाला शहर पोलिस ठाण्यात आणले. पोलिस स्टेशन पाहूनच हातपाय गळाले. आम्ही भोकाड पसरले ! आम्हाला ज्याने पकडले होते त्या रमेश नावाच्या साध्या वेशातील पोलिसाने ड्युटीवरील पीएसआय सोनार यांना सर्व प्रकार कथन केला. आम्ही थंडी ने कुडकुडत होतो. मोठ्ठ्या डोळ्यांच्या रागीट दिसणा-या सोनार साहेबांनी आम्हाला बरेच प्रश्न विचारले. कुठे राहता, काय करतात, कोणत्या शाळेत शिकतात, आणि महत्त्वाचा प्रश्न - तुम्हाला हे कुणी करायला सांगितले ? आम्हाला नाव सांगा, मग तुम्हाला सोडून देऊ. 

' आम्हाला आमचे मुख्य शिक्षक घन:श्याम जोशी यांनी असे लिहायला सांगितले ' मी उत्तर देऊन मोकळा झालो !

झाले. पोलिस लगेचच घन:श्याम जोशींच्या तहसील कचेरी जवळ असलेल्या घरी गेले. तोपर्यंत ते फरार झाले होते. 

बळीराम पेठेत सगळीकडे पोलिस बंदोबस्त वाढला होता. आमच्या घरा समोर साध्य वेशातील पोलिस उभे होते. वडील रेल्वेत गार्ड च्या नोकरीला असल्याने ते ड्युटी वर गेले होते. घरात ऐंशी वर्षे वयाची पॅरॅलिसीस झालेली आजी, परावलंबी असलेले माझे काका, माझी आई आणि माझ्या पेक्षा लहान असलेल्या दोन बहिणी. बरीच रात्र झाल्याने अस्वस्थ होऊन सारे माझी वाट पाहत होते. तितक्यात पोलीसांनी दार वाजवले. समोर पोलिस पाहून आई फार घाबरली. तुमच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे तुम्ही चला पोलिस स्टेशन ला. मग माझी आई आणि राजू साठे ची आई अशा दोघी एकमेकींच्या सोबतीने पोलिस स्टेशन ला आल्या. आई ला पाहाताच मी रडायला सुरुवात केली. पोलिसांची जुजबी प्रश्नोत्तरे झाली. घरुन आमचं अंथरुण पांघरुण मागवून पोलिस स्टेशन च्या हाॅल मध्येच आम्हाला झोपायला सांगितले. झोप तर उडाली होती. 

सकाळी पी आय निंबाळकर साहेब आले. गुन्हा दाखल करण्यात आला. आम्हाला पोलिस जीप मध्ये बसवून ज्या ज्या ठिकाणी आम्ही भिंतीवर घोषणा लिहिल्या होत्या तेथे तेथे नेउन पंचनामा करण्यात आला. पोलिस गाडी, पोलिसांच्या गराड्यात आम्ही दोघे , फोटो ग्राफर - हा काय प्रकार चाललाय हे पाहायला ठिकठिकाणी मोठी गर्दी.

पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आमची वरात पोहोचली. तीथे पोलिस कोठडी मधून कुणी तरी आम्हाला हाका मारल्या. पाहातो तर बळीराम पेठेतील ॲड. राजू दिक्षित. आदल्या दिवशीच त्यांनी रस्त्यावर येऊन घोषणा दिल्या मुळे ते ही अटकेत होते. मात्र ते १८ वर्षांवरील असल्याने पोलिस कोठडी मध्ये होते. आम्ही अल्पवयीन असल्याने कोठडीत ठेवले नव्हते.

दुपारी ३ वाजता आम्हाला कोर्टात नेण्यात आले. आता च्या गुजरात स्वीट मार्ट च्या समोरच्या जागेत तेव्हा जळगाव चे छोटे कोर्ट होते.

श्री. सापत्नेकर जज साहेबांच्या समोर आमची पेशी झाली.

सरकारी वकील श्री काझी यांनी कोर्टात सांगितले की, या मुलांनी केलेले कृत्य हे एक षडयंत्र आहे. म्हणून तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. ती मान्य करून आम्ही १८ वर्षाच्या आतील बाल गुन्हेगार असल्याने आम्हाला बाल सुधारगृहात ( रिमांड होम ) मध्ये ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले.

मला आठवतंय, कोर्टात आम्हाला भेटायला, धीर द्यायला जनसंघाचे शिवाजीनगर मधील कार्यकर्ते स्व. दत्तोपंत पाटील आले होते !

त्या नंतर पोलिस आम्हाला रिमांड होम मध्ये घेऊन गेले. तिथले सोपस्कार पार पाडले. 

     (अभिमन्यू सायं शाखेचे सत्याग्रही स्वयंसेवक - उदय भालेराव, घन:शाम जोशी, रघुपती साठे आणि सतिश मदाने)

आता दुपार चे चार वाजले होते. त्या ठिकाणी आमची भेट बळीराम पेठेतील आमच्या शाखेचे स्वयंसेवक श्री. सतिश मदाने आणि श्री. संजय कुलकर्णी यांच्या शी झाली. ते दोघे आमच्या पेक्षा वयाने थोडे मोठे असले तरी १८ वर्षांच्या आत असल्याने त्यांना सुध्दा रिमांड होम मध्येच ठेवले होते. त्या दोघांना तीथे पाहून मला खूप आनंद झाला, हायसे वाटले. तेही सत्त्याग्रह केल्या मुळे त्या ठिकाणी होते. चला कुणी तरी आपल्या ओळखीचे इथे आहेत तर !

संध्याकाळी ६ वाजता शिटी वाजली. रिमांड होम मधील सगळी मुले ग्राउंड मध्ये गोळा झाली. सतीश मदानेंनी रिमांड होम मधील सगळ्या बालगुन्हेगार मुलांकडून गणपती स्तोत्र आणि काही प्रार्थना म्हणून घेतल्या. तिथल्या मुक्कामात त्यांचा तो रोज चा दिनक्रम होता.

रात्री माझ्या वडिलांचे रेल्वेतील सहकारी आणि जीवाभावाचे स्नेही श्री. इनामदार काका हे माझ्यासाठी घरचे जेवण घेऊन आले. कोर्टाने आम्हाला घरचे जेवण घ्यायला परवानगी दिली होती.रिमांड होम पासून इनामदार काकांचे घर जवळ असल्याने दररोज सकाळी व संध्याकाळी काका आणि ते ड्युटी वर गेले असतील तर इनामदार काकू ( त्या सुध्दा शासकीय सेवेत होत्या ) चहा-नास्ता, जेवण घेऊन येत. दरम्यान भालेराव आणि साठे या बळीराम पेठेतील दोन लहान मुलांना पोलिसांनी पकडले आहे ही बातमी वृत्तपत्रात छापून आली नसली तरी, गावभर पसरली होती. पण आमच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवला तर पोलिस त्रास देतील या भिती ने आमचे शेजारी पाजारी, गावातील परिचयाचे लोक, नातेवाईक सुध्दा त्या काळात ढुंकूनही पाहत नव्हते, अपवाद केवळ इनामदार कुटुंबीयांचा !

आम्ही रिमांड होम मध्ये असताना पोलिसांनी माझ्या वडिलांना अनेक वेळा पोलिस स्टेशन ला चौकशी साठी बोलावून घेतले. मुलांवर बारीक लक्ष ठेवा अन्यथा तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. त्या काळात संपूर्ण कुटुंबाला खूप मनस्ताप झाला. वडिलांची नौकरी जाते की काय अशी परिस्थिती होती. सगळीकडे मोठी दहशत होती.

१० दिवसांनंतर कोर्टाने आम्हाला दोघांना, आमच्या वडिलांनी आमच्या वतीने दिलेल्या चांगल्या वर्तणूकीच्या वैयक्तिक बाॅंडवर व एका प्रतिष्ठित व्यक्ती ने दिलेल्या जामिनावर मुक्त केले. या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत जळगावातील निष्णात फौजदारी वकील आणि माझ्या वडिलांचे बालपणा पासून चे जिवाभावाचे मित्र स्व.ॲड. अच्युतराव ऊर्फ बाबासाहेब अत्रे यांनी मोलाची मदत केली. त्या सार्वत्रिक दहशतीच्या छायेत सुध्दा ॲड. अत्रे बाबा यांनी अत्यंत निर्भयपणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच सत्याग्रहींचे न्यायालयीन खटले चालवले, ते ही विनामोबदला ! स्व. बाबा माझ्या बद्दल सांगताना अभिमानाने म्हणायचे, " हा माझा सगळ्यात लहान वयाचा पक्षकार बरं का. "

सुटके नंतर आम्ही घरी आलो. आता वडील नक्की झोडुन काढणार असे वाटत असतानाच त्यांनी मायेने जवळ घेऊन डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवला अन् म्हणाले, " घाबरु नकोस . खूप खूप मोठा हो ".

वडिलांचे ते शब्द माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत. अन्यायाच्या विरोधात लढण्याची शक्ती आणि बळ वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी मला माझ्या वडिलांच्या त्या शब्दानी प्राप्त झाले !

पुढे आणिबाणी संपेपर्यंत दोन, तीन वेळा पोलिसांनी मला आणि साठे ला जळगावातील अन्य सत्त्याग्रहीं सोबत २४ तासांसाठी अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. 

 कधी आणिबाणीच्या पहिल्या वर्धापन दिना चे निमित्त तर कधी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण जळगावात येणार म्हणून ! यावेळी संघटना काॅंग्रेस, प्रजासमाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष तसेच जनसंघाचे स्थानिक नेते यांना पोलीस अटक करून कधी पोलीस मल्टीपर्पज हाॅल मध्ये तर कधी पोलीस मुख्यालयात २४ तासांसाठी डिटेन करून ठेवत. यात वयोवृद्ध नेते स्व. भैय्यासाहेब देवकीनंदन , स्व शांतीलालजी रायसोनी, स्व. ॲड नंदलाल दहाड, स्व. नथमल जांगडा , स्व. प्रा. श्यामकांत कुळकर्णी आदी सर्व पक्षीय विरोधी नेते असत. आमच्या परिचयाचे ॲड श्रीकांत भुसारी, श्री गजानन पन्नालाल जोशी, ॲड राजू दिक्षित, श्री देवेश कासखेडीकर आदी मंडळी २४ तास सोबत असत. 

आज ४७ वर्षांनंतर मागे वळून पाहताना - अगदी लहान वयातील या सत्त्याग्रहाने माझ्या जिवनात एक वेगळेच स्थित्यंतर घडवून आणल्याची भावना आहे. अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचे आणि आपल्या मातृभूमीला परंवैभवाप्रत नेण्यासाठी कटीबद्ध होण्याचे बाळकडू त्यातूनच मिळाले हे मात्र नक्की !

भारत माता की जय


उदय नारायण भालेराव.

Friday, September 16, 2022

भाजपा ची धर्मशाळा होऊ नये

                   


१९५२ साली या देशात  जनसंघ या प्रखर राष्ट्रवादी विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षाच्या मिणमिणत्या दिव्याची ज्योत प्रज्वलीत झाली होती.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक, अटलजी, अडवाणी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रयत्नांची पराकाष्ठा करत , अनेक हाल अपेष्टा सोसत जनसंघाच्या दिव्याची ती ज्योत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली !
कालांतराने १९८० साली जनसंघाच्या तळपत्या दिव्याच्या ज्योतीतून भारतीय जनता पार्टी च्या कमलपुष्पा चा उदय झाला.  तत्कालीन जनसंघाच्या किंवा आता च्या भारतीय जनता पार्टी ची विचारसरणी मानणारी व्यक्ती कधीकाळी या देशाच्या राष्ट्रपती पदावर, पंतप्रधान पदावर विराजमान होईल अशी दूर दूर पर्यंत शक्यता वाटत नसताना च्या,  त्या काळात असंख्य कार्यकर्त्यांनी घरच्या भाकरी खाऊन प्रसंगी प्रत्यक्ष दगड-शेण अंगावर झेलत, वेळोवेळी तुरुंगवास पत्करत तर स्वर्गिय.पंडित दिनदयाळ उपाध्याय आणि आमच्या जळगाव जिल्ह्यातील स्वर्गिय बापू वाणी यांच्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांनी या विचारसरणी साठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. राजकीय सत्ता मिळवणे आणि मिळालेली सत्ता उपभोगणे हे ध्येय या मंडळींचे कधीच नव्हते. या सर्व आठवणी माझ्या सारख्या सामान्य जुन्या कार्यकर्त्यांना अभिमानास्पद अशाच आहेत.
आज भारतीय जनता पार्टी चा चहूकडे विस्तार झालेला दिसतो आहे.  सर्व समाज घटकांचे नवनवीन कार्यकर्ते - नेते जोडत जोडत पक्षाचा विस्तार होत असतो.  नवीन जोडला जाणारा प्रत्येकच  कार्यकर्ता हा काही तुमच्या विचारधारेकडे आकृष्ट होऊनच आलेला असेल असे नाही. यातील अनेक जण हौसे, नवशे आणि गवशे या संज्ञेचे असणार! सत्ता हाच ज्यांचा श्वास आहे , मिळालेल्या सत्तेतून गडगंज पैसा कमावणे हेच ज्यांचे ध्येय आहे अशा मंडळींचा सत्ता जाताच  जीव कासावीस होतो. अशा सत्तेच्या आस-याने जगणा-या स्वार्थी मंडळींना मग राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टी मध्ये सामील व्हावे असे वाटू लागले तर नवल नाही ! आणि मग एका रात्रीतून आपला पक्ष सोडून भाजपा मध्ये प्रवेश करणा-यांची रांग लागते...
काही वेळा राजकीय व्यूहरचनेचा भाग म्हणून भाजपा चे वरीष्ठ नेते अन्य पक्षातील मातब्बर मंडळींना आपल्या पक्षात दाखल करून घेतात. या नव्याने आलेल्या मंडळींना निवडणूकीचे तिकीटही दिले जाते. ते भाजपा चे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात. यातील काहींना मंत्रीपदाची लाॅटरी सुध्दा लागते. अर्थात हा त्या त्या वेळचा राजकीय अपरिहार्यतेचा भाग असू शकतो. पक्ष विस्तारासाठी असे मार्ग पक्षनेतृत्वाकडून अवलंबले जातात. अर्थात या बद्दल फारशी तक्रार असण्याचे कारण नाही.
पण भाजपा ची सत्ता जाताच यातील हौशे- गौशै भाजपा ची सोबत सोडून सत्तेच्या वळचणीला  गेल्याची उदाहरणे आहेत.
गोवा या छोट्याशा राज्यात नुकतेच काॅंग्रेस मधून ८ आमदारांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केल्याची बातमी आहे. यात दिगंबर कामत या माजी मुख्यमंत्री असलेल्या व्यक्ती चा देखील समावेश आहे. गंमतीचा ( ?) भाग म्हणूजे हेच मुळचे काॅंग्रेसी असलेले दिगंबर कामत मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात भाजपा चे मंत्री होते. मधल्या काळात त्यांना भारतीय जनता पार्टी ची कोणती ध्येय धोरणे पटली नाहीत कोण जाणे पण त्यांनी भाजपा सोडून काॅंग्रेस मध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत ते काॅंग्रेस चे आमदार म्हणून निवडून ही आले. वर्ष/दोन वर्षांत त्यांना काॅंग्रेस चा कंटाळा आला आणि आता पुन्हा एकदा कामत  आपल्या ७ सहकारी आमदारांच्या सोबती ने भाजपा च्या  हवेली मध्ये  मुक्कामी आले आहेत  ! ११ पैकी चक्क ८ आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याची अडचण नाही.  बरं आता हे दिगंबर कामतांच्या सोबत भाजपा मध्ये प्रवेश केलेले ८ आमदार किती दिवस, किती महिने वा किती वर्षे भाजपा च्या हवेली मध्ये मुक्काम करतात हे पाहणे औत्सुक्य पुर्ण असणार आहे !
अर्थात नेहमीच अस्थिर राजकीय वातावरण असणा-या गोव्यातील या सर्व जोड-तोडी  चा भविष्यात भाजपा ला दीर्घकालीन लाभ होऊ शकतो हे लक्षात घेऊनच भाजपा नेतृत्वाने या  आयारामांना पक्षात प्रवेश दिला असेल असे मानण्यास जागा आहे.
गोव्याचे जाउद्या पण जळगावात तरी वेगळे काय चाललंय  ? चार वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर, जगातल्या कुठल्याही राजकीय विचारसरणी शी बांधीलकी नसणा-या लोकांच्या झुंडीच्या झुंडी भाजपा च्या टुमदार हवेली मध्ये डेरे दाखल झाल्या.  कारण त्या वेळी केंद्रा प्रमाणेच राज्यात सुध्दा भाजपा ची सत्ता होती.  राज्यात सत्ता पालट होताच या स्वार्थी  झुंडी भाजपा तून बाहेर पडून राज्यातल्या सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला पोहोचल्या.  आता दोन महिन्यांपूर्वी राज्यात भाजप सत्तेवर आल्याबरोबर या स्वार्थी सत्तालोभी मंडळींनी पुन्हा एकदा नामदार श्री गिरीशभाउ यांच्या भोवती रुंजी घालण्यास सुरुवात केली आहे.
या मंडळींना भाजपा म्हणजे   धर्मशाळा वाटते आहे की काय ?
अर्थात भाजपा च्या टुमदार हवेली ची  धर्मशाळा होऊ द्यायची की नाही याचा निर्णय भाजपा च्या नेतृत्वाने घ्यायचा   आहे ! या मातृभुमीला परंवैभवाप्रत   नेण्यासाठी कटीबद्ध असलेल्या सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांना भाजपा च्या टुमदार हवेली ची अशा रीतीने धर्मशाळा झालेली कसे मान्य  होईल  ?

उदय भालेराव, जळगाव
७८७५५५८१५०

Saturday, August 27, 2022

गुलाम नबी आझाद एन डी ए मध्ये सहभागी होणार का ?


ब-याच  प्रतिक्षेनंतर अखेर काल जेष्ठ काॅंग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा जम्मू काश्मिर चे माजी मुख्यमंत्री श्री. गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

खरं पाहता आझाद हे कधीचेच काॅंग्रेस पासून दुरावत चालले होते. मोदी सरकार ने घटनेचे कलम ३७० रद्द केल्या नंतर  गुलाम नबी यांनी डॉ फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती या अन्य काश्मिरी नेत्यांप्रमाणे जहाल आणि भडकाऊ प्रतिक्रिया न देता त्या संदर्भात विरोधी, पण संयमीत वक्तव्य केले होते याचे त्यावेळी आश्चर्य वाटले होते.  काॅंग्रेस अंतर्गत बंडखोर मानल्या गेलेल्या  " जी २३ "  गटात त्यांचा सक्रिय सहभाग असणे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या आझाद यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याचा  राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर काॅंग्रेस ने त्यांना  पुन्हा संधी न देणे, जम्मू काश्मिर प्रदेशातील पक्षाच्या प्रचार समितीचे पक्षाने देऊ केलेले पद आझाद यांनी ठोकरणे  हा सगळा घटनाक्रम पाहता, सतत च्या पराभवातून कोणताही बोध न घेणाऱ्या, कसलेही  राजकीय भवितव्य नसणा-या  काॅंग्रेस पक्षाचा  त्याग करण्याचा आझादांचा  निर्णय हा अपेक्षितच होता !

 गेले जवळपास ५० वर्ष काॅंग्रेस चे पाईक असलेले, नेहरू -गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या ७३ वर्षिय आझाद यांची आता पुढील राजकीय वाटचाल कशी असेल ?

काॅंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असला तरी आझाद यांनी   कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. आझाद यांच्या सारखी  राजकीय महत्वाकांक्षा असलेली व्यक्ती राजकीय संन्यास घेण्याची सुतराम शक्यता नाही. राजकारणात टिकून राहण्यासाठी, सार्वजनिक जीवनात सक्रिय राहाण्यासाठी  त्यांना कुठल्यातरी राजकीय व्यासपीठाचा आश्रय घ्यावाच लागणार आहे ( जसे कपिल सिब्बल यांनी काॅंग्रेस सोडून समाजवादी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून राज्यसभेतील खासदारकी कायम राखली ) किंवा  आझादांना  स्वतः चे राजकीय व्यासपीठ  (राजकीय पक्ष ) निर्माण करावे लागणार आहे. कधी काळी जम्मू काश्मिर चे मुख्यमंत्री पद भूषविलेले   आणि राज्यात स्वतः ची स्वतंत्र ओळख निर्माण केलेले गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेस सोडल्या नंतर फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षात किंवा मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी ची सोबत न करता स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून आझाद यांची राष्ट्रीय राजकारणात भाजपशी, त्यातही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी वाढलेली जवळीक वेगळेच काही दर्शवते आहे. आझाद यांचा राज्यसभा सदस्यत्वा चा कार्यकाळ संपल्यानंतर निवृत्त होणा-या सदस्यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान मोदी यांनी आझाद यांच्या कर्तृत्वाचे मुक्त कंठाने,  एका क्षणी तर अतिशय भाऊक होत  केलेल्या कौतुकाने अनेकांच्या  भुवया उंचावल्या होत्या. पुढे जाऊन यंदा च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत आझाद यांच्या नावाची घोषणा होताच जणू  चर्चांचे पेव फुटले. मात्र मुरब्बी राजकारणी असलेल्या संयमी आझादांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्याची घाई केलेली नाही. 

लवकरच केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मिर मध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागणार आहे. कलम ३७० हटवल्या नंतर ची पहिली सार्वत्रिक निवडणूक म्हणून या निवडणुकी कडे देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक भाजपा, खास करून मोदी -शहा यांच्या प्रतिष्ठेची असणार आहे. त्या साठी ते  कोणतीही कसर सोडणार नाहीत हे नक्की. आज तरी भारतीय जनता पार्टी कडे  राज्यात  मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक आणि आश्वासक असा चेहरा नाही. हिंदू बहुल जम्मू रिजन मध्ये भाजपा विधानसभेच्या बहुतांश जागा जिंकू शकतो तथापि सत्ता स्थापन करण्यासाठी काही जागा कमी पडू शकतात. मुस्लिम बहुल काश्मिर खो-यात भाजपा साठी अद्याप स्थीती फारशी अनुकूल नाही.  स्वबळावर भाजपा खो_यातील  विधानसभेच्या जागा जिंकू  शकेल असे आजच म्हणणे  धाडसाचे ठरेल . अशा स्थितीत गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाशी निवडणूक पश्चात भारतीय जनता पार्टी ची  युती होऊन सरकार स्थापनेसाठी मदत होऊ शकते. या बदल्यात गुलाम नबी आझाद यांना केंद्रीय मंत्री पद मिळून त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकते. एन डी ए मध्ये एका नव्या मित्र पक्षाची भर पडून त्याचा लाभ २०२४ च्या लोकसभा जिंकण्यासाठी होऊ शकतो.

जम्मू काश्मिर या नव्याने गठीत झालेल्या केंद्र शासित राज्यात आपला अजेंडा राबविण्यासाठी, आज असलेला छुपा दहशतवाद खणुन काढण्यासाठी त्या राज्यात भाजप ची सत्ता असणे मोदी -शहा यांच्या साठी अत्यावश्यक आहे. त्या करीता ही दुक्कल काय वाट्टेल ते करु शकते. काॅंग्रेस मधून बाहेर पडलेल्या गुलाम नबी आझाद यांची सध्या ची वाटचाल बघता हे सर्व अगदीच अशक्य वाटत नाही


उदय भालेराव, जळगाव 

7875558150



Wednesday, March 24, 2021

चला दादा होऊया

      


 

      आज २४ मार्च.  डॉ. अविनाश रामचंद्र उपाख्य दादासाहेब आचार्य या लोकोत्तर  महापुरुषाची  पुण्यतिथी !  समाजावर आई सारखे निस्वार्थ प्रेम करुया - हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांची शिकवण, शेवटच्या श्वासापर्यंत अंगी बाणवणारे डॉ आचार्य  हे स्वतः च मातृ हृदयी  व्यक्तिमत्व होते.   बालवयातच संघ संस्कार लाभलेल्या दादांना खरं तर संघ प्रचारक व्हायचे होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पन्नास वर्षांपूर्वी जळगावातील गर्भश्रीमंत आणि सुसंस्कारित डाॅक्टर कुटुंबातील हा युवक  कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातो  काय अन्  यादवराव जोशींच्या संपर्कात येवून परीपक्व  आणि संघसमर्पित  स्वयंसेवक बनतो काय, सारेच  अद्भुत ! वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून दादा जळगावात आले.  त्या काळातील केवळ उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या विदर्भ आणि मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागातील  एक ख्यातनाम प्रसुती तज्ञ आणि स्त्री रोग तज्ञ असा लौकिक डॉ आचार्यांनी स्वकर्तृत्वावर मिळवीला होता. वैद्यकीय व्यवसायात स्थीर होत असतानाच दादांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघचालक अशा मोठ्या जबाबदारी चे दायित्व आले. दवाखान्यातील रुग्णांची गर्दी यशस्वी रित्या सांभाळून दादांचा संघाच्या कामासाठी प्रत्येक तालुक्यात प्रवास सुरू झाला. सोमवार ते शनिवार दवाखान्याचा व्याप सांभाळून प्रत्येक रविवारी दादा स्वतः च्या अलिशान कार ने जळगाव जिल्ह्यातील खेडोपाडी जाऊन संघ विचार रुजविण्यासाठी, वाढविण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत. यातून दादांनी राजकीय विचारसरणी च्या पलिकडे जाऊन  अनेक माणसे जोडली. एकदा चोपडा तालुक्यातील दुर्गम वनवासी भागात दादा  एका वस्तीत गेले. दादा प्रत्यक्ष आपल्या अंगणात आलेले पाहून तो गरीब वनवासी म्हातारा प्रचंड भारावून गेला होता. दादा त्याच्या खाटेवर बसले. घरात अतिशय गरिबी असल्याने दादांचे आदरातिथ्य कसे करावे हा त्याला मोठा प्रश्न पडला. तेव्हढ्यात त्याने अंगातील बंडी च्या खिशातून एक विडी आणि माचिस काढून दादांसमोर धरली अन्  म्हणाला, ' दादा तुमच्या साठी चहा करु म्हटले पण दुधच नाही. आता ही विडी तरी ओढा.' आयुष्यात कधी वीडी सिगारेट न ओढणारे दादांनी त्याच्या भावना समजून घेत त्याने दिलेल्या विडी चे दोन झुरके ओढून त्या कुटुंबाचा निरोप घेऊन तेथून पुढे निघाले.  समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो आहे. समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना सतत वाटत असे. या संदर्भात त्यांचे अखंड चिंतन सुरू असे. त्यातूनच एकदा जळगावातील सहकार्यां समवेत विदर्भातील चिखली येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथील संघस्वयंसेवकांनी सहकारी तत्त्वावर सुरू केलेल्या बॅंकेचे काम पाहून आपण ही जळगावात सहकारी बँक सुरू करावी असा विचार दृढ झाला. यातूनच पुढे डॉ आचार्यांनी आजच्या जळगाव जनता सहकारी बँकेचा श्रीगणेशा केला. मात्र त्याच सुमारास देशभर आणिबाणी जारी झाल्या ने मा. दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मीसा  कायदया खाली अटक झाली. दादा १९ महिने स्थानबद्ध होते. जेल मधून बाहेर येताच श्री. बाबा दप्तरी, स्व. शर्माजी, स्व.डाॅ. खटावकर, स्व. ऐड. अच्युतराव अत्रे, स्व.पुंडे काका अशा अनेक संघ स्वयंसेवकांच्या सहभागातून जनता बॅंक स्थापन झाली.स्वाभाविकपणे बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अविदादां कडे आली. अल्पावधीतच डॉ आचार्यांची जळगाव जनता बॅंक उत्तर महाराष्ट्रात नावारूपाला आली. दादांनी बॅंकेचे काम शेवटच्या श्वासापर्यंत अत्यंत निरलसपणे, निःस्पृहपणे व पारदर्शकपणे केले.  त्यांची संघनिष्ठा अविचल होती. ते कायम संघ शरण भुमिकेत जगले. डॉ अविनाशदादा  आचार्यांनी केवळ जनता बॅंक नावारूपाला आणली असे नव्हे तर केशवस्मृती प्रतिष्ठान च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात विवेकानंद प्रतिष्ठान, ब्लड बँक, वृध्दाश्रम, झुणका भाकर केंद्र, जळगाव जनता इन्फोटेक कंपनी, आदी समाजोपयोगी विविध प्रकारचे प्रकल्प उभे केले. जळगाव जनता सहकारी बँक तसेच वर उल्लेख केलेल्या विविध सेवा प्रकल्पांसाठी दादांनी दुरदृष्टी ने समाजातील अन्य अन्य क्षेत्रातील असंख्य कर्तबगार,  हरहुन्नरी माणसे जोडली. दादांना माणसाची उत्तम पारख होती. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले, अनेकांना मोठे केले. आज दादांच्या पश्चात बॅंकेचे अध्यक्ष पद सक्षमपणे, सेवाभावी वृत्तीने सांभाळत असलेले प्राचार्य राव सर, आई च्या भुमिकेतून  जगत असलेले, केशवस्मृती सेवा संस्था समुहाचे सर्वेसर्वा असलेले श्री भरत दादा अंमळकर या सारख्या निःस्पृह कार्यकर्त्यांच्या    बळावरच स्व.दादांनी उभे केलेले हे साम्राज्य आज स्वयंपुर्ण पणे दमदार वाटचाल करीत आहे. स्व. अविदादांचा स्वीय सहाय्यक म्हणून काही काळ त्यांच्या समवेत काम करण्याचे भाग्य मला लाभले. त्यातून या आभाळाएव्हढ्या  मोठ्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मला अगदी जवळून अनुभवता आले. हा माणूस अंतर्बाह्य प्रामाणिक आणि सचोटीने व्यवहार करणारा होता आणि आपल्या सहकाऱ्यांनीही तोच कित्ता गिरवावा या वर त्यांचा कटाक्ष असे. दादा बॅंकेत केवळ एक कप चहा पीत असत. जळगावातील श्रीराम मंदिराचे विश्वस्त मंडळावर कार्यरत  असताना संस्थान मध्ये दादा पाणी सुध्दा घेत नसत ! मला आठवतंय, अॅपेक्स को आॅपरेटीव्ह  बॅंकेचे दादा संस्थापक संचालक होते. दरमहा मिटींग साठी त्यांना मुंबई ला जावे लागायचे. मा. दादांची बायपास शस्त्रक्रिया झाल्या पासून श्रीमती अनुराधा वहिनी प्रवासात आवर्जून त्यांच्या समवेत असत. दादांची सुरवातीलाच स्पष्ट केले होते, त्यांच्या मुंबई प्रवासाचा खर्च अॅपेक्स बॅंक करणार, बॅंक कर्मचारी म्हणून माझा प्रवास खर्च बॅंक करेल. मात्र अनुराधा वहिनींच्या मुंबई प्रवासाचा खर्च दादा व्यक्तिगत रीत्या करीत. मुंबईत ते  नेहमी नातेवाईकांकडेच उतरत. खासगी कामासाठी त्यांनी कधीच बॅंकेची गाडी वापरली नाही. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून स्व.दादांनी सर्वांसाठी दंडक घालून दिले होते. आदर्श पती, प्रेमळ पिता, नातवंडां साठी वात्सल्य मुर्ती असलेले अहो बाबा, आणि आम्हा कर्मचाऱ्यांचे अन्नदाते स्व.दादा ! आज सुमारे ३००० कोटींचा एकत्रीत व्यवसाय करणारी डॉ आचार्यांची जनता बॅंक ! केशवस्मृती सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध सेवा प्रकल्पांचे सुरू असलेले समाजोपयोगी उपक्रम, त्याद्वारे अनेकांच्या घरांत पेटत असलेली चूल !! एवढे मोठ्ठे काम उभे करणा-या या ऋषितुल्य  व्यक्तिमत्त्वाचा भारत सरकारने खरं तर मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यास  प्रत्ययवार नसावा !!! आज स्व. डॉ अविनाशदादा आचार्यांच्या पुण्यतिथी निमित्त, त्यांनी घालून दिलेल्या वाटेवर मार्गक्रमण करीत आपण सगळे दादा होण्याचा प्रयत्न करू या.   

बी.उदयन.

Saturday, January 30, 2021

अयोध्या आंदोलनातील ते मंतरलेले दिवस ( भाग -२ )



अयोध्येतील १९८९ ची पहिली कारसेवा तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी दडपशाही करून हाणून पाडली असली तरी देशभर हिंदुत्वाचा हुंकार स्पष्ट पणे ऐकू येत होता.करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या  रामजन्मभूमी वरील  अत्याचाराचे प्रतिक असलेला बाबरी ढांचा पाहुन हिंदू मनामनात चिड उत्पन्न होत होती. त्याच दरम्यान उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये रामजन्मभूमी आंदोलनाला  जाहीर पाठिंबा देणा-या भारतीय जनता पार्टी ला अभुतपुर्व यश मिळून कल्याण सिंह मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले. केंद्रात कांग्रेस चे नरसिंह राव सरकार कार्यरत होते. याच काळात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून झालेल्या विराट संत संमेलनात सरकार ला इशारा दिला गेला आणि अयोध्येत कारसेवेसाठी ६ डिसेंबर १९९२ ही तारीख मुक्रर करण्यात आली !

देशभर संत-महंत, साधू, ठिकठिकाणचे पिठाधिश्वर तसेच मठाधिपती यांनी सभा, प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती करीत ६ डिसेंबर चलो अयोध्या हा नारा जनतेला दिला. विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी उमा भारती, साध्वी ऋतुंभरा, आचार्य धर्मेंद्र जी, तसेच परीषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्व. अशोक जी सिंघल, डॉ . तोगडिया आदींनी देशभर झंझावाती दौरे काढून देशात रामभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. आता बाबरी मशिदीचे संरक्षण कसे करणार असा मुद्दा देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळींनी उपस्थित  केला. बाबरी ढांचा चे संरक्षण करण्याचे  प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाने घेतले,  तर कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत प्रवेश करुन शांततापूर्ण मार्गाने कारसेवा करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेने जाहीर केला.  

पुन्हा एकदा राम भक्तांच्या, कारसेवकांच्या झुंडीच्या झुंडी ६ डिसेंबर च्या कारसेवेसाठी देशाच्या सर्व भागांतून अयोध्येत कडे रवाना होउ लागल्या. जळगाव जिल्ह्यातून तसेच जळगाव शहरांतून गेल्या वेळच्या कारसेवेपेक्षा कितीतरी पटीने अधिक संख्येने कारसेवक अयोध्येला जाण्यासाठी निघाले. महिलांची संख्या ही लक्षणीय होती. या कारसेवे साठी  प्रवासात कुठेही अडवणूक न होता आम्ही ४  डिसेंबर रोजी थेट अयोध्येत पोहोचलो. अयोध्येतील वातावरण अभुतपुर्व होते. तेलगु, कन्नड,उडीया, गुजराती, आसामी, बंगाली आदी विविध भाषा बोलणारे कारसेवक जिकडे-तिकडे दृष्टोत्पत्तीस पडत होते. भाषा कोणतीही असली, पेहराव कोणताही असला तरी सर्वांच्या तोंडी एक शब्द मात्र समान होता.. जय श्री राम !                         

निरनिराळ्या प्रांतातून आलेल्या कारसेवकां साठी शरयु नदीच्या काठावर विस्तिर्ण पटांगणावर मोठमोठे मांडव उभारण्यात आले होते.  शेजारी च भटारखाने. सर्व प्रकारचे अत्यंत बारीक सारीक नियोजन होते. सकाळी प्रात:विधी आटोपून झाले की चहापान त्या नंतर संघप्रार्थना. मग शरयु च्या थंडगार पाण्यात डुबकी लावून फ्रेश होऊन नास्ता उरकायचा. त्यानंतर त्या च ठिकाणी मान्यवर संत, साध्वी, यांच्या आवेशपूर्ण भाषणांना सुरुवात होत असे. वेळ मिळेल तसा आम्ही अयोध्येतील रस्त्यावर फेरफटका मारुन स्थानिक मंडळींशी बोलत होतो. त्यांच्या ही मनात कारसेवे बाबत कमालीची उत्सुकता जाणवत होती. अखेर ६ डिसेंबर ची सकाळ उजाडली ! तीन, तीन च्या रांगा करून रामाच्या जयघोषात शांतता पुर्ण कारसेवेसाठी आम्ही रामजन्मभूमी परीसराकडे कुच केले.             

लांबुनच विवादास्पद ढांचा  दिसू लागला. त्या ढांच्या च्या चारही बाजूंनी दुहेरी आणि मजबुत कंपाऊंड केले होते. सभोवताली मिलेटरी चे सशस्त्र जवान तसेच उत्तर प्रदेश चे हत्यारबंद पोलिस गराडा घालून होते. विवादास्पद ढांचा पासून अगदी समोर, सुमारे २०० मिटर अंतरावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपीठावर मा. लालकृष्ण अडवाणी, स्व अशोक जी सिंघल, डॉ. मुरली मनोहर जोशी, साध्वी उमा भारती, साध्वी ऋतुंभरा तसेच संत-महंत विराजमान झाले होते. व्यासपीठासमोर काही लाखांचा जनसमुदाय उपस्थित होता. सकाळी १० चे सुमारास सभेला सुरुवात झाली. व्यासपीठावरील वक्त्यांच्या ओजस्वी आणि स्फुल्लिंग चेतविणा-या भाषणांनी उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला होता. प्रत्येक जण कारसेवेसाठी आतुर झाला होता, प्रत्येकाच्या मनात एकच विचार येत होता, कशी होणार कार सेवा ? 

तेव्हढ्यात विवादास्पद ढांचा च्या बाजूला काही तरी गडबड, हुल्लडबाजी सुरू झाली असल्याचे जाणवले. सगळेच जण उभे राहून तिकडे काय चाललंय ते पहाण्याचा प्रयत्न करू लागले. अन् काही क्षणातच ढांचा चे कंपाऊंड मोडून, सुरक्षा रक्षकांना न जुमानता  मोठा जमाव ढाच्या  वर तुटून पडल्या चे दृश्य दिसू लागले. बरेच कारसेवक ढाच्या वर चढून त्या इमारतीचे घुमट कुदळी ने तोडू लागले होते. पहाता पहाता सैन्य दल आणि पोलिस शांत पणाने , हताशपणे बाजूला उभे राहिले. लाखोंच्या संख्येने कारसेवक मिळेल ते हत्यार घेऊन ती इमारत पाडू लागले. व्यासपीठावरील नेते मंडळी व अन्य मान्यवर लाऊड स्पीकर वरून जमावाला शांततेचे आवाहन करीत होते. पण कारसेवे च्या ईर्षेने पेटलेला तो जमाव कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यातच आमच्या गृप ची सुध्दा पांगापांग झाली. मी आणि जळगाव चे वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते सुनील जंगले एकमेकांचा हात धरून त्या गर्दीत घुसलो. एक साधु बाबा त्यांच्या हातातील त्रिशूळ उलटा धरुन भिंत पाडण्याचा प्रयत्न करत होते.आम्ही त्यांच्या कडून थोड्या वेळासाठी त्यांचा त्रिशूळ मागून घेतला आणि समोर ची भिंत पाडण्यासाठी सरसावलो. जवळपास १५ मिनिटे आम्ही कारसेवा करीत होतो. 

सायंकाळचे ४.३० -५ वाजले होते. बाबरी ढांचा चे तिन्ही  घुमट तसेच ती संपूर्ण वास्तू जमिनदोस्त झाली होती. आम्ही सारे च आनंदाने आणि आश्चर्याने बेभान झालो होतो. जे घडले होते ते डोळ्यासमोर दिसत असुनही माझा माझ्याच डोळ्यां वर विश्वास बसत नव्हता ! अंधार पडता पडता आम्ही आमच्या पेंडाल मध्ये परतलो. दिवसभराच्या श्रमाने थकल्या मुळे रात्री जेवण होताच आम्ही गाढ झोपी गेलो. मध्यरात्री केव्हा तरी शिटी वाजली. व्यवस्थाप्रमुखांची उठा, चला.. तयार व्हा..आरोळी ऐकू न सगळे धडपडत उठलो. तेव्हढ्यात सुचना ऐकू आली., ' पुन्हा कारसेवेसाठी रामजन्मभूमी परीसराकडे कुच करायचे आहे'. त्या कडाक्याच्या थंडीत धावत पळत जन्मभूमी जवळ पोहोचलो. मोठ्या संख्येने उपस्थित कार सेवकांनी रामजन्मभूमी परीसराला घेराव घातला होता. त्या ठिकाणचा मलबा हटवून जागा सपाट केली. तात्पुरत्या स्वरूपात एक छोटे मंदिर उभारणी चे काम रातोरात  सुरू झाले.

जळगावचे  दीपक राव घाणेकर,  तत्कालीन जिल्हा संघचालक स्व.डाॅ. घाटे, मुकुंद मेटकर ,अन्य दोघे-तिघे व मी अशा आमच्या  जळगाव च्या गृप ने अर्धा तास विटा वाहण्यासाठी कारसेवा केली. सिमेंट- विटांचे छोटेखानी मंदिर उभारणी होताच त्यात पुन्हा रामलल्ला च्या मुर्ती विराजमान केल्या. त्यानंतर पहाटे पुन्हा आम्ही आमच्या पेंडाल मध्ये परतलो.सर्वत्र एकदम उत्साहाचे वातावरण होते. आता सगळ्यांना परतीचे वेध लागले होते. अयोध्या रेल्वे स्टेशन वर कारसेवकांसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यातील मंडळी एकाच ट्रेन ने निघालो व मझल-दरमजल करीत सुमारे ४० तासांच्या प्रवासानंतर जळगाव स्टेशन वर उतरलो. 

अयोध्येतील कारसेवेसाठी काही कारणाने आमच्या सोबत येवु न शकलेले अनेक कार्यकर्ते, जेष्ठ स्वयंसेवक स्वागतासाठी स्टेशन वर आले होते.ही पण एक सुखद अनुभुती होती.  पुढचे काही दिवस देशातील अनेक भागात होते तसे तणावाचे वातावरण जळगाव जिल्ह्यात ही होते. पण अयोध्येतील ६ डिसेंबर च्या ऐतिहासिक कारसेवे मुळे देशभरातील हिंदू मनात  आत्मविश्वास निर्माण झाला हे मात्र निश्चित. बाबरी ढांचा उध्वस्त झाल्या ने  एक कलंक मिटला ही भावना जनमानसात प्रबळ झाली. 

१९९२ साली अयोध्येतील श्रीरामजन्मभुमी वरील वादग्रस्त ढांचा उध्वस्त झाल्याच्या घटनेनंतर सुध्दा न्यायालयात हा विषय प्रलंबित होता.   २०१९ मध्ये  या देशातील सर्वोच्च न्यायालयाने,  "ती " जागा रामजन्मभूमी च असल्याचा  ऐतिहासिक निर्णय दिल्याने मंदिर उभारणी चा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्या ५ आॅगस्ट ला अयोध्येत प्रस्तावित मंदिराचे भूमिपूजन संपन्न होऊन आता मंदिर निर्माणासाठी निधी संकलनाचे काम देशभर सुरू झाले आहे. 

अयोध्या आंदोलनाला त्या  वेळी  विरोध करणारे तसेच त्या आंदोलना पासून स्वतः ला जाणीवपूर्वक  अलिप्त  ठेवणारे आता राममंदिरासाठी  निधी संकलनात पुढे आहेत, हा हिंदूत्वा चा प्रभाव आहे.  दोन्ही वेळा झालेली कारसेवा घरात -मातोश्रींच्या कुशीत सुखेनैव बसून टीव्ही वर गंमत म्हणून पहाणारे आता अयोध्येचे दौरे करताहेत.  त्या वेळी या आंदोलनाला आर्थिक मदत मागायला आम्ही गेलो असता, नाकं मुरडणारी मंडळी आता मात्र लाखांच्या अन् कोटींच्या देणग्या देतात हे पाहीले कि हसू येते ! कालाय तस्मै नमः !! ही तर प्रभू श्रीरामचंद्राची लीला !!! अयोध्या आंदोलनात सहभागी होण्याचे, प्रत्यक्ष कारसेवा करण्याचे भाग्य मला लाभले ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. आता पुन्हा एकदा अयोध्येत जाऊन प्रत्यक्ष  मंदिर उभारणी च्या कार्यात किमान काही तास तरी द्यावेत अशी मनस्वी इच्छा आहे. बघुया कधी योग येतो ते !                                           

जय श्रीराम.

Tuesday, January 26, 2021

अयोध्या आंदोलनातील ते मंतरलेले दिवस ( भाग -१ )


सन १९८६ ! मी त्या वेळी विश्व हिंदू परिषदेच्या कामात होतो. पाचोरा येथे विश्व हिंदू परिषदेची जळगाव जिल्हा बैठक सुरु असतानाच फैजाबादच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने अयोध्या येथील वादग्रस्त जागेतील रामलल्लाच्या मंदिराचे कुलूप उघडण्याचा व रोजची पुजा करण्यास परवानगीचा निकाल दिला असल्याचे वृत्त येऊन थडकले... आणि त्या बैठकीत एकदम उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले. विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन जिल्हा संघटक डॉ. खटावकर यांनी बैठकीत याबाबतची सविस्तर माहिती आम्हा उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. पाचो-याचे जेष्ठ कार्यकर्ते स्व. कमळे गुरुजी यांनी पेढे वाटून आमचा सगळ्यांचा आनंद द्विगुणित केला. पण अजून मोठा पल्ला गाठायचा बाकी होताच. अयोध्येत ज्या ठिकाणी प्रभु श्रीरामाचा जन्म झाला, ती आमच्या श्रध्दास्थानाची जागा परकिय आक्रमक बाबराने बळजबरीने बळकावून उध्वस्त करुन त्याचे रुपांतर मशिदीत केल्याचे शल्य शेकडो वर्षे हिंदुंच्या मनात सलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने १९८९ पासून देशभर अयोध्या आंदोलनाला सुरुवात झाली. त्या वर्षी प्रथमच दस-याला होणारे स्वयंसेवकांचे संचलन रद्द करुन प्रत्येक गावातून श्रीराम प्रतिमांच्या  मोठमोठ्या शोभायात्रांचे आयोजन केले होते. जळगावात सुध्दा भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जुन्या गावातील श्रीराम मंदिरात भाजपचे ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नेते तत्कालीन खासदार स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या हस्ते पुजा व महाआरती होऊन शोभायात्रेला सुरुवात झाली. थकलेले असुनही  नानासाहेब पायीच मिरवणुकीत सहभागी झाले होते. नागरीकांच्या उत्साहाला उधाण आले होते.  मिरवणुकांमध्ये सकल हिंदू समाज पारंपरिक वेशभूषेत बहुसंख्येने सहभागी झाल्याचे दृश्य सर्वत्र पहायला मिळाले. या शिवाय राम पादुका पूजन, रामशीला पुजन, रामज्योत दिवाळी आदी उपक्रमांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत होता.  


याच दरम्यान जिल्हा स्तरावर तसेच मोठ्या शहरात श्रीराम कारसेवा समिती स्थापन करण्यात आल्या. जळगाव महानगर कारसेवा समितीचे अध्यक्ष पदावर जेष्ठ विधिज्ञ स्व. अच्युतराव अत्रे यांची निवड करण्यात आली तर समितीचा संयोजक म्हणून माझ्याकडे दायीत्व होते. रामजन्मभूमी विषयी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण करण्याचे काम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभर सुरू झाले होते. १९८९च्या सप्टेंबर महिन्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर प्रश्नासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रामरथ यात्रा सुरू केली. अडवाणीजींच्या या देशव्यापी रथयात्रेने देशभर वातावरण ढवळून निघाले. जळगाव जिल्ह्यातही ठिकठिकाणी बैठका, मिरवणूका, जाहीर सभा यातून ३० आक्टोबर चलो अयोध्या हा जयघोष दुमदुमत  होता. प्रत्येक गावातून ३० आक्टोबरच्या कारसेवेसाठी अयोध्येला जाण्यासाठी कारसेवकांचे जथ्थे तयार होऊ लागले होते. मात्र त्याचवेळी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत कारसेवा होऊ देणार नाही आणि तथाकथित बाबरी मशिदीचे संरक्षण करणारच असा चंग बांधला होता. आडवाणीजींची रथयात्रा बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी समस्तिपुर येथे अडवली व अडवानी प्रभुतींना तेथेच अटक केली. देशभरातून मोठ्या संख्येने कारसेवक मिळेल त्या रेल्वेने अयोध्येकडे निघाले. उत्तर प्रदेशच्या सीमेवर गाड्या अडवून पोलिस बळजबरीने कार सेवकांना उतरवून अटक करीत. परंतु बरेच कार्यकर्ते पोलिसांचा डोळा चुकवून शिताफीने निसटले आणि अलाहाबाद, लखनो पर्यंत पोहोचलेच ! 

८९ सालच्या पहिल्या कारसेवेसाठी जळगावातून सुमारे २०० कारसेवक दोन - तीन तुकड्या करुन निघाले होते. त्यापैकी आमचा ३५ जणांचा ग्रुप अलाहाबाद येथून अयोध्येकडे  थेट रस्त्याने न जाता आडवाटेने, शेताच्या बांधावरून पायवाटेने निघालो. हेतू हा की पोलिसांच्या दृष्टीस पडू नये. सतत ३ दिवस आम्ही चालत होतो. वाटेत अनेक खेडेगावात आमची दुपारच्या जेवणाची तसेच कडाक्याच्या थंडीत सुध्दा रात्रीच्या जेवण-मुक्कामाची सोय ठिकठिकाणच्या स्थानिक लोकांनी मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने केली. आम्ही अयोध्ये पासून केवळ १०/१२ किमी अंतरावर असतानाच शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतले व अटक करुन एका शाळेत - तात्पुरत्या तुरूंगात डांबले. आम्ही अयोध्येत पोहोचू शकलो नाही तरी पण लपतछपत अयोध्येत पोहचलेल्या अन्य ठिकाणच्या काही कार्यकर्त्यांनी वादग्रस्त जागेपर्यंत जावून कारसेवेचा प्रयत्न केला त्या वेळी झालेल्या गोळीबारात काही कारसेवक शहीद झाले आणि शरयुचे पाणी लाल झाले ! अशा रीतीने १९८९ ची पहिली कारसेवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी हाणून पाडली. मात्र तरीही संपूर्ण देशभरातील हिंदूत्व या आंदोलनाच्या निमित्ताने जागृत झाले ही मोठीच उपलब्धती मानली जाते. 

अनेक साधू-संत महंत, मठाधिपती ही मंडळी विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनास प्रतिसाद देत राममंदिर आंदोलनात सहभागी झाले. देशभरातून जात, पंथ -उपपंथ, भाषा, प्रांतभेद, गरीब श्रीमंत असा कोणताही अभिनिवेश न बाळगता केवळ रामभक्त आणि हिंदू या भावनेतून लाखो लोक भगव्या ध्वजाखाली एकत्र आले हे या आंदोलनाला मिळालेले मोठे यश म्हणावे लागेल. (क्रमश:)

बी. उदयन 

Monday, January 4, 2021

निमित्त - अॅड. उज्ज्वल निकम यांच्या राजकारण प्रवेशाच्या बातमीचे...



राजकारण हा बदमाश लोकांचा प्रांत आहे, अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण प्रचलित आहे. अर्थात ही म्हण सदा सर्वकाळ, सर्वच राजकारण्यांना सरसकटपणे लागू होणारी आहे असे मला वाटत नाही. स्थल, काल आणि व्यक्तिसापेक्ष असे या म्हणीचे स्वरूप असावे असे मी मानतो. आपापल्या क्षेत्रात कर्तबगार असणा-या सत्प्रवृत्त आणि प्रामाणिक माणसांनी राजकीय क्षेत्रात सहभागी झाले पाहिजे अशी अपेक्षा नेहमी व्यक्त केली जाते. पण आज राजकीय क्षेत्र इतके बरबटलेले आहे की अशी चांगली माणसे राजकारणाच्या वाटेला अजिबात फिरकत सुद्धा नाही. नैतिकता आणि सचोटी  या शब्दांचा राजकारणाशी दुर दुरपर्यंत संबंध नाही अशी सार्वत्रिक अवस्था आहे. या उलट राजकारण आणि भ्रष्टाचार हे दोन समानार्थी शब्द आहेत अशीच भावना सर्वसामान्य जनतेत आहे आणि ही गोष्ट आपल्या कडच्या काही भ्रष्ट आणि अप्रामाणिक राजकारण्यांनी स्व-कर्तुत्वाने सिध्द केली असल्याचे ब-याचदा दिसून येते.

या संदर्भात कुणाकडे अंगुलीनिर्देश करण्याचे किंवा कुणाचे नाव घेण्याची आवश्यकता नाही.  मात्र असे असले तरी  राजकीय क्षेत्रातील या चिखलात सुध्दा काही ठिकाणी सदाचाराचे आणि सात्विकतेचे कमळ उमललेले पहायला मिळते. राजकारणाच्या भांगेत सुध्दा कुठे कुठे नैतिकतेची तुळस उगवलेली दृष्टोत्पत्तीस पडते आणि कुठे तरी आशेचा किरण आहे हे जाणवते. स्व. अटलबिहारी वाजपेयी हे अलिकडच्या काळातील, राजकारणातील स्वच्छ चारित्र्याचे ठसठशीत उदाहरण सांगता येईल. अटलजींच्या आचरणासारखी असंख्य माणसे आपल्या अवतीभवती आहेत पण ही मंडळी राजकारणाच्या वा-यालाही फिरकत नाहीत.

देशात आज डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सनदी लेखापाल, शिक्षक, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, साहित्यिक, उद्योजक, शेतकरी, पत्रकार, खेळाडू, चित्रपट कलावंत, प्रशासनातील निवृत्त अधिकारी आदी अनेक क्षेत्रांत स्व-कर्तृत्वाने मोठी असणारी मंडळी कार्यरत आहेत. यातली भिन्न भिन्न राजकीय विचारसरणी असणारी काही मंडळी जरी राजकीय क्षेत्रात सहभागी झाली तरी आजच्या राजकारणाचा पोत बदलायला निश्चितच मदत होईल असा विश्वास कुणी बाळगला तर त्यात चुकीचे काय ?  

या सगळ्या गोष्टी आत्ता आठवायचे कारण म्हणजे काल परवाच जेष्ठ विधिज्ञ पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांच्या संभाव्य राजकारण प्रवेशाचे वृत्त एका दैनिकात  प्रसिद्ध झाले आहे !  अर्थात निकम साहेबांच्या राजकारण प्रवेशाचे आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातील चर्चा या आधीही गेल्या लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सुरू झाली होती.

लोकसभा निवडणुक लढवण्यासंदर्भात त्यांना काही राजकीय नेत्यांनी शब्द टाकला असल्याचे त्यांनी मोकळेपणाने कबूल केले आहे.  अॅड. उज्ज्वल निकम साहेब त्यांच्या कार्यक्षेत्रात स्व-कर्तृत्वाने मोठं झालेलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. एक वकील म्हणून आपले बुद्धीकौशल्य पणाला लावून, प्रसंगी आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून या देशासाठी आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने अलीकडेच  त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. निकम साहेबांनी राजकीय क्षेत्रात सहभागी जरूर व्हावे. पण त्यांनी कुठलीही निवडणूक लढवू नये असे मला नेहमीच वाटते. मध्यंतरी त्यांच्या लोकप्रियतेचा आणि  ईलेक्टीव्ह मेरीटचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी काही मंडळींनी, निकम साहेबांनी लोकसभा निवडणुक लढवावी असा घाट घातला होता. तशी चर्चा माध्यमातून सुरू झाली होती. त्यावेळी देखील मी अॅड. उज्ज्वल निकम यांना सोशल मीडियातुन जाहीर पत्र लिहून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये असा अनाहूत सल्ला दिला होता. मात्र त्यावेळी आणि आज सुध्दा माझे असे ठाम मत आहे की, अॅड. उज्ज्वल निकम यांच्या सारखा देशभक्त आणि निष्णात कायदे पंडित देशाच्या संसदेत असलाच पाहिजे, पण दारोदार मतांचा जोगवा मागत फिरत, आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात लोकसभा निवडणुक लढवून संसदेत जाण्यापेक्षा राजकीय पक्षांनी किंवा मा. राष्ट्रपती महोदयांनी निकम साहेबांना सन्मानाने राज्यसभेत खासदार म्हणून स्थानापन्न करावे हेच योग्य राहील असे मला वाटते. आमच्या सार्वभौम आणि प्राणाहून प्रिय असणाऱ्या भारत मातेला उध्वस्त करु पहाणा-या राष्ट्रद्रोही आरोपींना, न्यायालयात शेवटच्या क्षणापर्यंत वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणा-या कायदेपंडितांना जर संसदेचे सदस्यत्व मिळू शकते तर त्याच देशद्रोहयांवरील आरोप  आपल्या  बुद्धी-कौशल्याने न्यायालयात सिद्ध करून त्यांना फासावर लटकवण्यासाठी पराकाष्ठा करणारे निकम साहेब संसदेत का नकोत ? अॅड. उज्ज्वल निकम यांच्या सारखे व्यक्तीमत्व  संसदेत असण्याने  संसदेचीच प्रतिष्ठा वाढेल. तशी  संधी मिळाली तर  संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे - राज्यसभेचे खासदार म्हणून या राष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्यासाठी ऐड. उज्वल निकम साहेब निश्चितपणे प्रयत्नशील राहतील हे मात्र नक्की.

तुर्तास अॅड. निकम साहेबांच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या निर्णयाला आपण शुभेच्छा देऊ या !

बी. उदयन, जळगाव.

३० डिसेंबर १९७५ ची ती रात्र

२६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणिबाणी ला आता जवळपास सहा महिने झाले होते. आणिबाणी म्...