अयोध्येतील १९८९ ची पहिली कारसेवा तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी दडपशाही करून हाणून पाडली असली तरी देशभर हिंदुत्वाचा हुंकार स्पष्ट पणे ऐकू येत होता.करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामजन्मभूमी वरील अत्याचाराचे प्रतिक असलेला बाबरी ढांचा पाहुन हिंदू मनामनात चिड उत्पन्न होत होती. त्याच दरम्यान उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये रामजन्मभूमी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणा-या भारतीय जनता पार्टी ला अभुतपुर्व यश मिळून कल्याण सिंह मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले. केंद्रात कांग्रेस चे नरसिंह राव सरकार कार्यरत होते. याच काळात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून झालेल्या विराट संत संमेलनात सरकार ला इशारा दिला गेला आणि अयोध्येत कारसेवेसाठी ६ डिसेंबर १९९२ ही तारीख मुक्रर करण्यात आली !
देशभर संत-महंत, साधू, ठिकठिकाणचे पिठाधिश्वर तसेच मठाधिपती यांनी सभा, प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती करीत ६ डिसेंबर चलो अयोध्या हा नारा जनतेला दिला. विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी उमा भारती, साध्वी ऋतुंभरा, आचार्य धर्मेंद्र जी, तसेच परीषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्व. अशोक जी सिंघल, डॉ . तोगडिया आदींनी देशभर झंझावाती दौरे काढून देशात रामभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. आता बाबरी मशिदीचे संरक्षण कसे करणार असा मुद्दा देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळींनी उपस्थित केला. बाबरी ढांचा चे संरक्षण करण्याचे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाने घेतले, तर कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत प्रवेश करुन शांततापूर्ण मार्गाने कारसेवा करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेने जाहीर केला.
पुन्हा एकदा राम भक्तांच्या, कारसेवकांच्या झुंडीच्या झुंडी ६ डिसेंबर च्या कारसेवेसाठी देशाच्या सर्व भागांतून अयोध्येत कडे रवाना होउ लागल्या. जळगाव जिल्ह्यातून तसेच जळगाव शहरांतून गेल्या वेळच्या कारसेवेपेक्षा कितीतरी पटीने अधिक संख्येने कारसेवक अयोध्येला जाण्यासाठी निघाले. महिलांची संख्या ही लक्षणीय होती. या कारसेवे साठी प्रवासात कुठेही अडवणूक न होता आम्ही ४ डिसेंबर रोजी थेट अयोध्येत पोहोचलो. अयोध्येतील वातावरण अभुतपुर्व होते. तेलगु, कन्नड,उडीया, गुजराती, आसामी, बंगाली आदी विविध भाषा बोलणारे कारसेवक जिकडे-तिकडे दृष्टोत्पत्तीस पडत होते. भाषा कोणतीही असली, पेहराव कोणताही असला तरी सर्वांच्या तोंडी एक शब्द मात्र समान होता.. जय श्री राम !
निरनिराळ्या प्रांतातून आलेल्या कारसेवकां साठी शरयु नदीच्या काठावर विस्तिर्ण पटांगणावर मोठमोठे मांडव उभारण्यात आले होते. शेजारी च भटारखाने. सर्व प्रकारचे अत्यंत बारीक सारीक नियोजन होते. सकाळी प्रात:विधी आटोपून झाले की चहापान त्या नंतर संघप्रार्थना. मग शरयु च्या थंडगार पाण्यात डुबकी लावून फ्रेश होऊन नास्ता उरकायचा. त्यानंतर त्या च ठिकाणी मान्यवर संत, साध्वी, यांच्या आवेशपूर्ण भाषणांना सुरुवात होत असे. वेळ मिळेल तसा आम्ही अयोध्येतील रस्त्यावर फेरफटका मारुन स्थानिक मंडळींशी बोलत होतो. त्यांच्या ही मनात कारसेवे बाबत कमालीची उत्सुकता जाणवत होती. अखेर ६ डिसेंबर ची सकाळ उजाडली ! तीन, तीन च्या रांगा करून रामाच्या जयघोषात शांतता पुर्ण कारसेवेसाठी आम्ही रामजन्मभूमी परीसराकडे कुच केले.
लांबुनच विवादास्पद ढांचा दिसू लागला. त्या ढांच्या च्या चारही बाजूंनी दुहेरी आणि मजबुत कंपाऊंड केले होते. सभोवताली मिलेटरी चे सशस्त्र जवान तसेच उत्तर प्रदेश चे हत्यारबंद पोलिस गराडा घालून होते. विवादास्पद ढांचा पासून अगदी समोर, सुमारे २०० मिटर अंतरावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपीठावर मा. लालकृष्ण अडवाणी, स्व अशोक जी सिंघल, डॉ. मुरली मनोहर जोशी, साध्वी उमा भारती, साध्वी ऋतुंभरा तसेच संत-महंत विराजमान झाले होते. व्यासपीठासमोर काही लाखांचा जनसमुदाय उपस्थित होता. सकाळी १० चे सुमारास सभेला सुरुवात झाली. व्यासपीठावरील वक्त्यांच्या ओजस्वी आणि स्फुल्लिंग चेतविणा-या भाषणांनी उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला होता. प्रत्येक जण कारसेवेसाठी आतुर झाला होता, प्रत्येकाच्या मनात एकच विचार येत होता, कशी होणार कार सेवा ?
तेव्हढ्यात विवादास्पद ढांचा च्या बाजूला काही तरी गडबड, हुल्लडबाजी सुरू झाली असल्याचे जाणवले. सगळेच जण उभे राहून तिकडे काय चाललंय ते पहाण्याचा प्रयत्न करू लागले. अन् काही क्षणातच ढांचा चे कंपाऊंड मोडून, सुरक्षा रक्षकांना न जुमानता मोठा जमाव ढाच्या वर तुटून पडल्या चे दृश्य दिसू लागले. बरेच कारसेवक ढाच्या वर चढून त्या इमारतीचे घुमट कुदळी ने तोडू लागले होते. पहाता पहाता सैन्य दल आणि पोलिस शांत पणाने , हताशपणे बाजूला उभे राहिले. लाखोंच्या संख्येने कारसेवक मिळेल ते हत्यार घेऊन ती इमारत पाडू लागले. व्यासपीठावरील नेते मंडळी व अन्य मान्यवर लाऊड स्पीकर वरून जमावाला शांततेचे आवाहन करीत होते. पण कारसेवे च्या ईर्षेने पेटलेला तो जमाव कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यातच आमच्या गृप ची सुध्दा पांगापांग झाली. मी आणि जळगाव चे वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते सुनील जंगले एकमेकांचा हात धरून त्या गर्दीत घुसलो. एक साधु बाबा त्यांच्या हातातील त्रिशूळ उलटा धरुन भिंत पाडण्याचा प्रयत्न करत होते.आम्ही त्यांच्या कडून थोड्या वेळासाठी त्यांचा त्रिशूळ मागून घेतला आणि समोर ची भिंत पाडण्यासाठी सरसावलो. जवळपास १५ मिनिटे आम्ही कारसेवा करीत होतो.
सायंकाळचे ४.३० -५ वाजले होते. बाबरी ढांचा चे तिन्ही घुमट तसेच ती संपूर्ण वास्तू जमिनदोस्त झाली होती. आम्ही सारे च आनंदाने आणि आश्चर्याने बेभान झालो होतो. जे घडले होते ते डोळ्यासमोर दिसत असुनही माझा माझ्याच डोळ्यां वर विश्वास बसत नव्हता ! अंधार पडता पडता आम्ही आमच्या पेंडाल मध्ये परतलो. दिवसभराच्या श्रमाने थकल्या मुळे रात्री जेवण होताच आम्ही गाढ झोपी गेलो. मध्यरात्री केव्हा तरी शिटी वाजली. व्यवस्थाप्रमुखांची उठा, चला.. तयार व्हा..आरोळी ऐकू न सगळे धडपडत उठलो. तेव्हढ्यात सुचना ऐकू आली., ' पुन्हा कारसेवेसाठी रामजन्मभूमी परीसराकडे कुच करायचे आहे'. त्या कडाक्याच्या थंडीत धावत पळत जन्मभूमी जवळ पोहोचलो. मोठ्या संख्येने उपस्थित कार सेवकांनी रामजन्मभूमी परीसराला घेराव घातला होता. त्या ठिकाणचा मलबा हटवून जागा सपाट केली. तात्पुरत्या स्वरूपात एक छोटे मंदिर उभारणी चे काम रातोरात सुरू झाले.
जळगावचे दीपक राव घाणेकर, तत्कालीन जिल्हा संघचालक स्व.डाॅ. घाटे, मुकुंद मेटकर ,अन्य दोघे-तिघे व मी अशा आमच्या जळगाव च्या गृप ने अर्धा तास विटा वाहण्यासाठी कारसेवा केली. सिमेंट- विटांचे छोटेखानी मंदिर उभारणी होताच त्यात पुन्हा रामलल्ला च्या मुर्ती विराजमान केल्या. त्यानंतर पहाटे पुन्हा आम्ही आमच्या पेंडाल मध्ये परतलो.सर्वत्र एकदम उत्साहाचे वातावरण होते. आता सगळ्यांना परतीचे वेध लागले होते. अयोध्या रेल्वे स्टेशन वर कारसेवकांसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यातील मंडळी एकाच ट्रेन ने निघालो व मझल-दरमजल करीत सुमारे ४० तासांच्या प्रवासानंतर जळगाव स्टेशन वर उतरलो.
अयोध्येतील कारसेवेसाठी काही कारणाने आमच्या सोबत येवु न शकलेले अनेक कार्यकर्ते, जेष्ठ स्वयंसेवक स्वागतासाठी स्टेशन वर आले होते.ही पण एक सुखद अनुभुती होती. पुढचे काही दिवस देशातील अनेक भागात होते तसे तणावाचे वातावरण जळगाव जिल्ह्यात ही होते. पण अयोध्येतील ६ डिसेंबर च्या ऐतिहासिक कारसेवे मुळे देशभरातील हिंदू मनात आत्मविश्वास निर्माण झाला हे मात्र निश्चित. बाबरी ढांचा उध्वस्त झाल्या ने एक कलंक मिटला ही भावना जनमानसात प्रबळ झाली.
१९९२ साली अयोध्येतील श्रीरामजन्मभुमी वरील वादग्रस्त ढांचा उध्वस्त झाल्याच्या घटनेनंतर सुध्दा न्यायालयात हा विषय प्रलंबित होता. २०१९ मध्ये या देशातील सर्वोच्च न्यायालयाने, "ती " जागा रामजन्मभूमी च असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्याने मंदिर उभारणी चा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्या ५ आॅगस्ट ला अयोध्येत प्रस्तावित मंदिराचे भूमिपूजन संपन्न होऊन आता मंदिर निर्माणासाठी निधी संकलनाचे काम देशभर सुरू झाले आहे.
अयोध्या आंदोलनाला त्या वेळी विरोध करणारे तसेच त्या आंदोलना पासून स्वतः ला जाणीवपूर्वक अलिप्त ठेवणारे आता राममंदिरासाठी निधी संकलनात पुढे आहेत, हा हिंदूत्वा चा प्रभाव आहे. दोन्ही वेळा झालेली कारसेवा घरात -मातोश्रींच्या कुशीत सुखेनैव बसून टीव्ही वर गंमत म्हणून पहाणारे आता अयोध्येचे दौरे करताहेत. त्या वेळी या आंदोलनाला आर्थिक मदत मागायला आम्ही गेलो असता, नाकं मुरडणारी मंडळी आता मात्र लाखांच्या अन् कोटींच्या देणग्या देतात हे पाहीले कि हसू येते ! कालाय तस्मै नमः !! ही तर प्रभू श्रीरामचंद्राची लीला !!! अयोध्या आंदोलनात सहभागी होण्याचे, प्रत्यक्ष कारसेवा करण्याचे भाग्य मला लाभले ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. आता पुन्हा एकदा अयोध्येत जाऊन प्रत्यक्ष मंदिर उभारणी च्या कार्यात किमान काही तास तरी द्यावेत अशी मनस्वी इच्छा आहे. बघुया कधी योग येतो ते !
जय श्रीराम.




