राजकारण हा बदमाश लोकांचा प्रांत आहे, अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण प्रचलित आहे. अर्थात ही म्हण सदा सर्वकाळ, सर्वच राजकारण्यांना सरसकटपणे लागू होणारी आहे असे मला वाटत नाही. स्थल, काल आणि व्यक्तिसापेक्ष असे या म्हणीचे स्वरूप असावे असे मी मानतो. आपापल्या क्षेत्रात कर्तबगार असणा-या सत्प्रवृत्त आणि प्रामाणिक माणसांनी राजकीय क्षेत्रात सहभागी झाले पाहिजे अशी अपेक्षा नेहमी व्यक्त केली जाते. पण आज राजकीय क्षेत्र इतके बरबटलेले आहे की अशी चांगली माणसे राजकारणाच्या वाटेला अजिबात फिरकत सुद्धा नाही. नैतिकता आणि सचोटी या शब्दांचा राजकारणाशी दुर दुरपर्यंत संबंध नाही अशी सार्वत्रिक अवस्था आहे. या उलट राजकारण आणि भ्रष्टाचार हे दोन समानार्थी शब्द आहेत अशीच भावना सर्वसामान्य जनतेत आहे आणि ही गोष्ट आपल्या कडच्या काही भ्रष्ट आणि अप्रामाणिक राजकारण्यांनी स्व-कर्तुत्वाने सिध्द केली असल्याचे ब-याचदा दिसून येते.
या संदर्भात कुणाकडे अंगुलीनिर्देश करण्याचे किंवा कुणाचे नाव घेण्याची आवश्यकता नाही. मात्र असे असले तरी राजकीय क्षेत्रातील या चिखलात सुध्दा काही ठिकाणी सदाचाराचे आणि सात्विकतेचे कमळ उमललेले पहायला मिळते. राजकारणाच्या भांगेत सुध्दा कुठे कुठे नैतिकतेची तुळस उगवलेली दृष्टोत्पत्तीस पडते आणि कुठे तरी आशेचा किरण आहे हे जाणवते. स्व. अटलबिहारी वाजपेयी हे अलिकडच्या काळातील, राजकारणातील स्वच्छ चारित्र्याचे ठसठशीत उदाहरण सांगता येईल. अटलजींच्या आचरणासारखी असंख्य माणसे आपल्या अवतीभवती आहेत पण ही मंडळी राजकारणाच्या वा-यालाही फिरकत नाहीत.
देशात आज डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सनदी लेखापाल, शिक्षक, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, साहित्यिक, उद्योजक, शेतकरी, पत्रकार, खेळाडू, चित्रपट कलावंत, प्रशासनातील निवृत्त अधिकारी आदी अनेक क्षेत्रांत स्व-कर्तृत्वाने मोठी असणारी मंडळी कार्यरत आहेत. यातली भिन्न भिन्न राजकीय विचारसरणी असणारी काही मंडळी जरी राजकीय क्षेत्रात सहभागी झाली तरी आजच्या राजकारणाचा पोत बदलायला निश्चितच मदत होईल असा विश्वास कुणी बाळगला तर त्यात चुकीचे काय ?
या सगळ्या गोष्टी आत्ता आठवायचे कारण म्हणजे काल परवाच जेष्ठ विधिज्ञ पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांच्या संभाव्य राजकारण प्रवेशाचे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाले आहे ! अर्थात निकम साहेबांच्या राजकारण प्रवेशाचे आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातील चर्चा या आधीही गेल्या लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सुरू झाली होती.
लोकसभा निवडणुक लढवण्यासंदर्भात त्यांना काही राजकीय नेत्यांनी शब्द टाकला असल्याचे त्यांनी मोकळेपणाने कबूल केले आहे. अॅड. उज्ज्वल निकम साहेब त्यांच्या कार्यक्षेत्रात स्व-कर्तृत्वाने मोठं झालेलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. एक वकील म्हणून आपले बुद्धीकौशल्य पणाला लावून, प्रसंगी आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून या देशासाठी आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने अलीकडेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. निकम साहेबांनी राजकीय क्षेत्रात सहभागी जरूर व्हावे. पण त्यांनी कुठलीही निवडणूक लढवू नये असे मला नेहमीच वाटते. मध्यंतरी त्यांच्या लोकप्रियतेचा आणि ईलेक्टीव्ह मेरीटचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी काही मंडळींनी, निकम साहेबांनी लोकसभा निवडणुक लढवावी असा घाट घातला होता. तशी चर्चा माध्यमातून सुरू झाली होती. त्यावेळी देखील मी अॅड. उज्ज्वल निकम यांना सोशल मीडियातुन जाहीर पत्र लिहून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये असा अनाहूत सल्ला दिला होता. मात्र त्यावेळी आणि आज सुध्दा माझे असे ठाम मत आहे की, अॅड. उज्ज्वल निकम यांच्या सारखा देशभक्त आणि निष्णात कायदे पंडित देशाच्या संसदेत असलाच पाहिजे, पण दारोदार मतांचा जोगवा मागत फिरत, आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात लोकसभा निवडणुक लढवून संसदेत जाण्यापेक्षा राजकीय पक्षांनी किंवा मा. राष्ट्रपती महोदयांनी निकम साहेबांना सन्मानाने राज्यसभेत खासदार म्हणून स्थानापन्न करावे हेच योग्य राहील असे मला वाटते. आमच्या सार्वभौम आणि प्राणाहून प्रिय असणाऱ्या भारत मातेला उध्वस्त करु पहाणा-या राष्ट्रद्रोही आरोपींना, न्यायालयात शेवटच्या क्षणापर्यंत वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणा-या कायदेपंडितांना जर संसदेचे सदस्यत्व मिळू शकते तर त्याच देशद्रोहयांवरील आरोप आपल्या बुद्धी-कौशल्याने न्यायालयात सिद्ध करून त्यांना फासावर लटकवण्यासाठी पराकाष्ठा करणारे निकम साहेब संसदेत का नकोत ? अॅड. उज्ज्वल निकम यांच्या सारखे व्यक्तीमत्व संसदेत असण्याने संसदेचीच प्रतिष्ठा वाढेल. तशी संधी मिळाली तर संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे - राज्यसभेचे खासदार म्हणून या राष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्यासाठी ऐड. उज्वल निकम साहेब निश्चितपणे प्रयत्नशील राहतील हे मात्र नक्की.
तुर्तास अॅड. निकम साहेबांच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या निर्णयाला आपण शुभेच्छा देऊ या !
बी. उदयन, जळगाव.

Apratim lekh .
ReplyDeleteExcellent !!!
ReplyDeleteExcellent analysis and write up
ReplyDeleteपरंतु त्या साठी काही वैचारिक तडजोडी कराव्या लागतील, कारण राज्यसभेत जायचं म्हणजे कोणत्या पक्षाचा शिक्का बसेल, मग वैचारिक तडजोडी आल्याचं.
ReplyDeleteअगदी योग्य लिहिलंय सरजी,मा.निकम साहेबांची खरी आवश्यकता ते सध्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत तिथेच जास्त आहे, तरीही मा.राष्ट्रपती महाेदयांनी सन्मानाने त्यांना राज्यसभेत खासदार म्हणून स्थान दिल्यास योग्यच होईल यात शंकाच नाही.अतिशय ज्वलंत विषयावर अगदी योग्य वेळी भाष्य केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील विषयासाठी शुभेच्छा. - अनिल रा.पाटील
ReplyDelete