ब-याच प्रतिक्षेनंतर अखेर काल जेष्ठ काॅंग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा जम्मू काश्मिर चे माजी मुख्यमंत्री श्री. गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
खरं पाहता आझाद हे कधीचेच काॅंग्रेस पासून दुरावत चालले होते. मोदी सरकार ने घटनेचे कलम ३७० रद्द केल्या नंतर गुलाम नबी यांनी डॉ फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती या अन्य काश्मिरी नेत्यांप्रमाणे जहाल आणि भडकाऊ प्रतिक्रिया न देता त्या संदर्भात विरोधी, पण संयमीत वक्तव्य केले होते याचे त्यावेळी आश्चर्य वाटले होते. काॅंग्रेस अंतर्गत बंडखोर मानल्या गेलेल्या " जी २३ " गटात त्यांचा सक्रिय सहभाग असणे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या आझाद यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर काॅंग्रेस ने त्यांना पुन्हा संधी न देणे, जम्मू काश्मिर प्रदेशातील पक्षाच्या प्रचार समितीचे पक्षाने देऊ केलेले पद आझाद यांनी ठोकरणे हा सगळा घटनाक्रम पाहता, सतत च्या पराभवातून कोणताही बोध न घेणाऱ्या, कसलेही राजकीय भवितव्य नसणा-या काॅंग्रेस पक्षाचा त्याग करण्याचा आझादांचा निर्णय हा अपेक्षितच होता !
गेले जवळपास ५० वर्ष काॅंग्रेस चे पाईक असलेले, नेहरू -गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या ७३ वर्षिय आझाद यांची आता पुढील राजकीय वाटचाल कशी असेल ?
काॅंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असला तरी आझाद यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. आझाद यांच्या सारखी राजकीय महत्वाकांक्षा असलेली व्यक्ती राजकीय संन्यास घेण्याची सुतराम शक्यता नाही. राजकारणात टिकून राहण्यासाठी, सार्वजनिक जीवनात सक्रिय राहाण्यासाठी त्यांना कुठल्यातरी राजकीय व्यासपीठाचा आश्रय घ्यावाच लागणार आहे ( जसे कपिल सिब्बल यांनी काॅंग्रेस सोडून समाजवादी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून राज्यसभेतील खासदारकी कायम राखली ) किंवा आझादांना स्वतः चे राजकीय व्यासपीठ (राजकीय पक्ष ) निर्माण करावे लागणार आहे. कधी काळी जम्मू काश्मिर चे मुख्यमंत्री पद भूषविलेले आणि राज्यात स्वतः ची स्वतंत्र ओळख निर्माण केलेले गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेस सोडल्या नंतर फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षात किंवा मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी ची सोबत न करता स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आझाद यांची राष्ट्रीय राजकारणात भाजपशी, त्यातही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी वाढलेली जवळीक वेगळेच काही दर्शवते आहे. आझाद यांचा राज्यसभा सदस्यत्वा चा कार्यकाळ संपल्यानंतर निवृत्त होणा-या सदस्यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान मोदी यांनी आझाद यांच्या कर्तृत्वाचे मुक्त कंठाने, एका क्षणी तर अतिशय भाऊक होत केलेल्या कौतुकाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पुढे जाऊन यंदा च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत आझाद यांच्या नावाची घोषणा होताच जणू चर्चांचे पेव फुटले. मात्र मुरब्बी राजकारणी असलेल्या संयमी आझादांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्याची घाई केलेली नाही.
लवकरच केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मिर मध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागणार आहे. कलम ३७० हटवल्या नंतर ची पहिली सार्वत्रिक निवडणूक म्हणून या निवडणुकी कडे देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक भाजपा, खास करून मोदी -शहा यांच्या प्रतिष्ठेची असणार आहे. त्या साठी ते कोणतीही कसर सोडणार नाहीत हे नक्की. आज तरी भारतीय जनता पार्टी कडे राज्यात मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक आणि आश्वासक असा चेहरा नाही. हिंदू बहुल जम्मू रिजन मध्ये भाजपा विधानसभेच्या बहुतांश जागा जिंकू शकतो तथापि सत्ता स्थापन करण्यासाठी काही जागा कमी पडू शकतात. मुस्लिम बहुल काश्मिर खो-यात भाजपा साठी अद्याप स्थीती फारशी अनुकूल नाही. स्वबळावर भाजपा खो_यातील विधानसभेच्या जागा जिंकू शकेल असे आजच म्हणणे धाडसाचे ठरेल . अशा स्थितीत गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाशी निवडणूक पश्चात भारतीय जनता पार्टी ची युती होऊन सरकार स्थापनेसाठी मदत होऊ शकते. या बदल्यात गुलाम नबी आझाद यांना केंद्रीय मंत्री पद मिळून त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकते. एन डी ए मध्ये एका नव्या मित्र पक्षाची भर पडून त्याचा लाभ २०२४ च्या लोकसभा जिंकण्यासाठी होऊ शकतो.
जम्मू काश्मिर या नव्याने गठीत झालेल्या केंद्र शासित राज्यात आपला अजेंडा राबविण्यासाठी, आज असलेला छुपा दहशतवाद खणुन काढण्यासाठी त्या राज्यात भाजप ची सत्ता असणे मोदी -शहा यांच्या साठी अत्यावश्यक आहे. त्या करीता ही दुक्कल काय वाट्टेल ते करु शकते. काॅंग्रेस मधून बाहेर पडलेल्या गुलाम नबी आझाद यांची सध्या ची वाटचाल बघता हे सर्व अगदीच अशक्य वाटत नाही
उदय भालेराव, जळगाव
7875558150

नको व्हायला असं, उभयपक्षी सन्मान पूर्वक म्हणायचे झाल्यास आझाद यांनी आझाद राहूनच भाजप ला पाठिंबा द्यावा. ते भाजप
ReplyDeleteमध्ये आल्यास इतक्या वर्षांचे त्यांच्या वरील संस्कार तत्यांना आणि भाजपला अस्वस्थ करतील.
भविष्याचा वेध... उदयराव लिहित रहा...
ReplyDeleteCan't express any opinion. Any way your writing skill is superb
ReplyDelete