सन १९८६ ! मी त्या वेळी विश्व हिंदू परिषदेच्या कामात होतो. पाचोरा येथे विश्व हिंदू परिषदेची जळगाव जिल्हा बैठक सुरु असतानाच फैजाबादच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने अयोध्या येथील वादग्रस्त जागेतील रामलल्लाच्या मंदिराचे कुलूप उघडण्याचा व रोजची पुजा करण्यास परवानगीचा निकाल दिला असल्याचे वृत्त येऊन थडकले... आणि त्या बैठकीत एकदम उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले. विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन जिल्हा संघटक डॉ. खटावकर यांनी बैठकीत याबाबतची सविस्तर माहिती आम्हा उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. पाचो-याचे जेष्ठ कार्यकर्ते स्व. कमळे गुरुजी यांनी पेढे वाटून आमचा सगळ्यांचा आनंद द्विगुणित केला. पण अजून मोठा पल्ला गाठायचा बाकी होताच. अयोध्येत ज्या ठिकाणी प्रभु श्रीरामाचा जन्म झाला, ती आमच्या श्रध्दास्थानाची जागा परकिय आक्रमक बाबराने बळजबरीने बळकावून उध्वस्त करुन त्याचे रुपांतर मशिदीत केल्याचे शल्य शेकडो वर्षे हिंदुंच्या मनात सलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने १९८९ पासून देशभर अयोध्या आंदोलनाला सुरुवात झाली. त्या वर्षी प्रथमच दस-याला होणारे स्वयंसेवकांचे संचलन रद्द करुन प्रत्येक गावातून श्रीराम प्रतिमांच्या मोठमोठ्या शोभायात्रांचे आयोजन केले होते. जळगावात सुध्दा भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जुन्या गावातील श्रीराम मंदिरात भाजपचे ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नेते तत्कालीन खासदार स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या हस्ते पुजा व महाआरती होऊन शोभायात्रेला सुरुवात झाली. थकलेले असुनही नानासाहेब पायीच मिरवणुकीत सहभागी झाले होते. नागरीकांच्या उत्साहाला उधाण आले होते. मिरवणुकांमध्ये सकल हिंदू समाज पारंपरिक वेशभूषेत बहुसंख्येने सहभागी झाल्याचे दृश्य सर्वत्र पहायला मिळाले. या शिवाय राम पादुका पूजन, रामशीला पुजन, रामज्योत दिवाळी आदी उपक्रमांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत होता.

याच दरम्यान जिल्हा स्तरावर तसेच मोठ्या शहरात श्रीराम कारसेवा समिती स्थापन करण्यात आल्या. जळगाव महानगर कारसेवा समितीचे अध्यक्ष पदावर जेष्ठ विधिज्ञ स्व. अच्युतराव अत्रे यांची निवड करण्यात आली तर समितीचा संयोजक म्हणून माझ्याकडे दायीत्व होते. रामजन्मभूमी विषयी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण करण्याचे काम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभर सुरू झाले होते. १९८९च्या सप्टेंबर महिन्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर प्रश्नासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रामरथ यात्रा सुरू केली. अडवाणीजींच्या या देशव्यापी रथयात्रेने देशभर वातावरण ढवळून निघाले. जळगाव जिल्ह्यातही ठिकठिकाणी बैठका, मिरवणूका, जाहीर सभा यातून ३० आक्टोबर चलो अयोध्या हा जयघोष दुमदुमत होता. प्रत्येक गावातून ३० आक्टोबरच्या कारसेवेसाठी अयोध्येला जाण्यासाठी कारसेवकांचे जथ्थे तयार होऊ लागले होते. मात्र त्याचवेळी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत कारसेवा होऊ देणार नाही आणि तथाकथित बाबरी मशिदीचे संरक्षण करणारच असा चंग बांधला होता. आडवाणीजींची रथयात्रा बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी समस्तिपुर येथे अडवली व अडवानी प्रभुतींना तेथेच अटक केली. देशभरातून मोठ्या संख्येने कारसेवक मिळेल त्या रेल्वेने अयोध्येकडे निघाले. उत्तर प्रदेशच्या सीमेवर गाड्या अडवून पोलिस बळजबरीने कार सेवकांना उतरवून अटक करीत. परंतु बरेच कार्यकर्ते पोलिसांचा डोळा चुकवून शिताफीने निसटले आणि अलाहाबाद, लखनो पर्यंत पोहोचलेच !

८९ सालच्या पहिल्या कारसेवेसाठी जळगावातून सुमारे २०० कारसेवक दोन - तीन तुकड्या करुन निघाले होते. त्यापैकी आमचा ३५ जणांचा ग्रुप अलाहाबाद येथून अयोध्येकडे थेट रस्त्याने न जाता आडवाटेने, शेताच्या बांधावरून पायवाटेने निघालो. हेतू हा की पोलिसांच्या दृष्टीस पडू नये. सतत ३ दिवस आम्ही चालत होतो. वाटेत अनेक खेडेगावात आमची दुपारच्या जेवणाची तसेच कडाक्याच्या थंडीत सुध्दा रात्रीच्या जेवण-मुक्कामाची सोय ठिकठिकाणच्या स्थानिक लोकांनी मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने केली. आम्ही अयोध्ये पासून केवळ १०/१२ किमी अंतरावर असतानाच शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतले व अटक करुन एका शाळेत - तात्पुरत्या तुरूंगात डांबले. आम्ही अयोध्येत पोहोचू शकलो नाही तरी पण लपतछपत अयोध्येत पोहचलेल्या अन्य ठिकाणच्या काही कार्यकर्त्यांनी वादग्रस्त जागेपर्यंत जावून कारसेवेचा प्रयत्न केला त्या वेळी झालेल्या गोळीबारात काही कारसेवक शहीद झाले आणि शरयुचे पाणी लाल झाले ! अशा रीतीने १९८९ ची पहिली कारसेवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी हाणून पाडली. मात्र तरीही संपूर्ण देशभरातील हिंदूत्व या आंदोलनाच्या निमित्ताने जागृत झाले ही मोठीच उपलब्धती मानली जाते.
अनेक साधू-संत महंत, मठाधिपती ही मंडळी विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनास प्रतिसाद देत राममंदिर आंदोलनात सहभागी झाले. देशभरातून जात, पंथ -उपपंथ, भाषा, प्रांतभेद, गरीब श्रीमंत असा कोणताही अभिनिवेश न बाळगता केवळ रामभक्त आणि हिंदू या भावनेतून लाखो लोक भगव्या ध्वजाखाली एकत्र आले हे या आंदोलनाला मिळालेले मोठे यश म्हणावे लागेल. (क्रमश:)
बी. उदयन
जय श्रीराम
ReplyDeleteकुटुंबातील सदस्य म्हणून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप खूप अभिनंदन.
ReplyDelete