Wednesday, March 24, 2021

चला दादा होऊया

      


 

      आज २४ मार्च.  डॉ. अविनाश रामचंद्र उपाख्य दादासाहेब आचार्य या लोकोत्तर  महापुरुषाची  पुण्यतिथी !  समाजावर आई सारखे निस्वार्थ प्रेम करुया - हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांची शिकवण, शेवटच्या श्वासापर्यंत अंगी बाणवणारे डॉ आचार्य  हे स्वतः च मातृ हृदयी  व्यक्तिमत्व होते.   बालवयातच संघ संस्कार लाभलेल्या दादांना खरं तर संघ प्रचारक व्हायचे होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पन्नास वर्षांपूर्वी जळगावातील गर्भश्रीमंत आणि सुसंस्कारित डाॅक्टर कुटुंबातील हा युवक  कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातो  काय अन्  यादवराव जोशींच्या संपर्कात येवून परीपक्व  आणि संघसमर्पित  स्वयंसेवक बनतो काय, सारेच  अद्भुत ! वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून दादा जळगावात आले.  त्या काळातील केवळ उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या विदर्भ आणि मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागातील  एक ख्यातनाम प्रसुती तज्ञ आणि स्त्री रोग तज्ञ असा लौकिक डॉ आचार्यांनी स्वकर्तृत्वावर मिळवीला होता. वैद्यकीय व्यवसायात स्थीर होत असतानाच दादांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघचालक अशा मोठ्या जबाबदारी चे दायित्व आले. दवाखान्यातील रुग्णांची गर्दी यशस्वी रित्या सांभाळून दादांचा संघाच्या कामासाठी प्रत्येक तालुक्यात प्रवास सुरू झाला. सोमवार ते शनिवार दवाखान्याचा व्याप सांभाळून प्रत्येक रविवारी दादा स्वतः च्या अलिशान कार ने जळगाव जिल्ह्यातील खेडोपाडी जाऊन संघ विचार रुजविण्यासाठी, वाढविण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत. यातून दादांनी राजकीय विचारसरणी च्या पलिकडे जाऊन  अनेक माणसे जोडली. एकदा चोपडा तालुक्यातील दुर्गम वनवासी भागात दादा  एका वस्तीत गेले. दादा प्रत्यक्ष आपल्या अंगणात आलेले पाहून तो गरीब वनवासी म्हातारा प्रचंड भारावून गेला होता. दादा त्याच्या खाटेवर बसले. घरात अतिशय गरिबी असल्याने दादांचे आदरातिथ्य कसे करावे हा त्याला मोठा प्रश्न पडला. तेव्हढ्यात त्याने अंगातील बंडी च्या खिशातून एक विडी आणि माचिस काढून दादांसमोर धरली अन्  म्हणाला, ' दादा तुमच्या साठी चहा करु म्हटले पण दुधच नाही. आता ही विडी तरी ओढा.' आयुष्यात कधी वीडी सिगारेट न ओढणारे दादांनी त्याच्या भावना समजून घेत त्याने दिलेल्या विडी चे दोन झुरके ओढून त्या कुटुंबाचा निरोप घेऊन तेथून पुढे निघाले.  समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो आहे. समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना सतत वाटत असे. या संदर्भात त्यांचे अखंड चिंतन सुरू असे. त्यातूनच एकदा जळगावातील सहकार्यां समवेत विदर्भातील चिखली येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथील संघस्वयंसेवकांनी सहकारी तत्त्वावर सुरू केलेल्या बॅंकेचे काम पाहून आपण ही जळगावात सहकारी बँक सुरू करावी असा विचार दृढ झाला. यातूनच पुढे डॉ आचार्यांनी आजच्या जळगाव जनता सहकारी बँकेचा श्रीगणेशा केला. मात्र त्याच सुमारास देशभर आणिबाणी जारी झाल्या ने मा. दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मीसा  कायदया खाली अटक झाली. दादा १९ महिने स्थानबद्ध होते. जेल मधून बाहेर येताच श्री. बाबा दप्तरी, स्व. शर्माजी, स्व.डाॅ. खटावकर, स्व. ऐड. अच्युतराव अत्रे, स्व.पुंडे काका अशा अनेक संघ स्वयंसेवकांच्या सहभागातून जनता बॅंक स्थापन झाली.स्वाभाविकपणे बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अविदादां कडे आली. अल्पावधीतच डॉ आचार्यांची जळगाव जनता बॅंक उत्तर महाराष्ट्रात नावारूपाला आली. दादांनी बॅंकेचे काम शेवटच्या श्वासापर्यंत अत्यंत निरलसपणे, निःस्पृहपणे व पारदर्शकपणे केले.  त्यांची संघनिष्ठा अविचल होती. ते कायम संघ शरण भुमिकेत जगले. डॉ अविनाशदादा  आचार्यांनी केवळ जनता बॅंक नावारूपाला आणली असे नव्हे तर केशवस्मृती प्रतिष्ठान च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात विवेकानंद प्रतिष्ठान, ब्लड बँक, वृध्दाश्रम, झुणका भाकर केंद्र, जळगाव जनता इन्फोटेक कंपनी, आदी समाजोपयोगी विविध प्रकारचे प्रकल्प उभे केले. जळगाव जनता सहकारी बँक तसेच वर उल्लेख केलेल्या विविध सेवा प्रकल्पांसाठी दादांनी दुरदृष्टी ने समाजातील अन्य अन्य क्षेत्रातील असंख्य कर्तबगार,  हरहुन्नरी माणसे जोडली. दादांना माणसाची उत्तम पारख होती. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले, अनेकांना मोठे केले. आज दादांच्या पश्चात बॅंकेचे अध्यक्ष पद सक्षमपणे, सेवाभावी वृत्तीने सांभाळत असलेले प्राचार्य राव सर, आई च्या भुमिकेतून  जगत असलेले, केशवस्मृती सेवा संस्था समुहाचे सर्वेसर्वा असलेले श्री भरत दादा अंमळकर या सारख्या निःस्पृह कार्यकर्त्यांच्या    बळावरच स्व.दादांनी उभे केलेले हे साम्राज्य आज स्वयंपुर्ण पणे दमदार वाटचाल करीत आहे. स्व. अविदादांचा स्वीय सहाय्यक म्हणून काही काळ त्यांच्या समवेत काम करण्याचे भाग्य मला लाभले. त्यातून या आभाळाएव्हढ्या  मोठ्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मला अगदी जवळून अनुभवता आले. हा माणूस अंतर्बाह्य प्रामाणिक आणि सचोटीने व्यवहार करणारा होता आणि आपल्या सहकाऱ्यांनीही तोच कित्ता गिरवावा या वर त्यांचा कटाक्ष असे. दादा बॅंकेत केवळ एक कप चहा पीत असत. जळगावातील श्रीराम मंदिराचे विश्वस्त मंडळावर कार्यरत  असताना संस्थान मध्ये दादा पाणी सुध्दा घेत नसत ! मला आठवतंय, अॅपेक्स को आॅपरेटीव्ह  बॅंकेचे दादा संस्थापक संचालक होते. दरमहा मिटींग साठी त्यांना मुंबई ला जावे लागायचे. मा. दादांची बायपास शस्त्रक्रिया झाल्या पासून श्रीमती अनुराधा वहिनी प्रवासात आवर्जून त्यांच्या समवेत असत. दादांची सुरवातीलाच स्पष्ट केले होते, त्यांच्या मुंबई प्रवासाचा खर्च अॅपेक्स बॅंक करणार, बॅंक कर्मचारी म्हणून माझा प्रवास खर्च बॅंक करेल. मात्र अनुराधा वहिनींच्या मुंबई प्रवासाचा खर्च दादा व्यक्तिगत रीत्या करीत. मुंबईत ते  नेहमी नातेवाईकांकडेच उतरत. खासगी कामासाठी त्यांनी कधीच बॅंकेची गाडी वापरली नाही. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून स्व.दादांनी सर्वांसाठी दंडक घालून दिले होते. आदर्श पती, प्रेमळ पिता, नातवंडां साठी वात्सल्य मुर्ती असलेले अहो बाबा, आणि आम्हा कर्मचाऱ्यांचे अन्नदाते स्व.दादा ! आज सुमारे ३००० कोटींचा एकत्रीत व्यवसाय करणारी डॉ आचार्यांची जनता बॅंक ! केशवस्मृती सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध सेवा प्रकल्पांचे सुरू असलेले समाजोपयोगी उपक्रम, त्याद्वारे अनेकांच्या घरांत पेटत असलेली चूल !! एवढे मोठ्ठे काम उभे करणा-या या ऋषितुल्य  व्यक्तिमत्त्वाचा भारत सरकारने खरं तर मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यास  प्रत्ययवार नसावा !!! आज स्व. डॉ अविनाशदादा आचार्यांच्या पुण्यतिथी निमित्त, त्यांनी घालून दिलेल्या वाटेवर मार्गक्रमण करीत आपण सगळे दादा होण्याचा प्रयत्न करू या.   

बी.उदयन.

6 comments:

  1. Very nicely worded, information article

    ReplyDelete
  2. सरजी,आपण खरोखरच भाग्यवान आहात.आदरणीय दादांसारख्या आभाळा एवढ्या मोठ्या आदर्श व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू अगदी जवळून अनुभवलेल्यांपैकी आपण एक आहात.असे भाग्य सर्वांना लाभत नाही.मला पण काही काळ या महान व्यक्तिमत्वाला बँकेच्या कामानिमित्त का होईना पण जवळून बघता आले. 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे'... या प्रार्थनेला आ.दादा संघाची नव्हे तर भारतमातेची प्रार्थना म्हणायचे आणि ती प्रत्येकाला म्हणता आली पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असायचा.अनेकांची तर ही प्रार्थना तोंडपाठ असूनही तारांबळ उडायची,त्यामुळे सहाजिकच ती घाईत संपवायच्या मागे असायचे.अर्थातच मग प्रार्थना संपताच आ.दादा त्यांची ती विशिष्ट पद्धतीची टाळी वाजवून प्रार्थना म्हणणाराला जवळ बोलावून 'वाघ कुठे आहे ?' असा प्रश्न विचारायचे,तेव्हा प्रार्थना म्हणणारा आश्चर्याने मागे वळून बघायचा.बाहेरगावी नसतील तर दररोज सायंकाळी ६ वा.नित्य नियमाने आ.दादा प्रार्थनेला बँकेत आवर्जून हजर असायचेत.नेमकं दररोज वेगवेगळ्या कर्मचारी बंधू-भगिनींना प्रार्थना म्हणायला सांगायचं अतिशय अवघड काम दूर्दैवानं माझ्याकडेच होतं.दूर्दैवाने अशा अर्थाने की,सर्वांचा रोष माझ्यावरच असायचा.बऱ्याचदा तर मी स्वतःच म्हणत होतो.अजून सुद्धा रोज सायंकाळी प्रार्थनेची आणि अर्थातच आ.दादांची आठवण कायम आहे आणि नेहमीच राहील.असा 'दादा' माणूस पुन्हा होणे नाही.आ. दादांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन,कोटी कोटी प्रणाम.
    -अनिल रामभाऊ पाटील,मो.७८७५९१०७८५

    ReplyDelete
  3. अगदी बरोबर म्हटलं सर
    एक व्यक्िमत्त्व,एक विचार अनेकांचे जिवन बदलू शकते असे शक्षात आदर्ष निर्माण केलेली व्यक्ती आपल्या जळगाव जिल्हा साठीच नाही तर महाराष्टराची प्रतिष्ठा आहे..

    धीरज वर्मा
    भाजपा जळगाव जिल्हा महानगर...

    ReplyDelete
  4. खरंच दादांबद्दल लिहावे तितके कमीच होईल. प्रसिद्धीपासून सतत दूर राहून खऱ्या अर्थाने समाजावर आई सारखे प्रेम करूया या उक्तीला प्रत्यक्ष अमलात आणणारे दादा होते. माझ्या सारख्या अगदी विवेकानंद प्रतिष्ठान मधील एक सामन्य शिक्षकाला देखील याची प्रचिती आली होती. दोन अनुभव दादांच्या व्यक्तिमत्त्वाला मनात कायम करून गेले.
    आदरणीय दादांची नातवंडे शानभाग शाळेत शिकत होती. दादांनी कधीही त्यांना व्यवस्थापन कुटुंबातील मुले आहेत अशी जाणीव देखील होऊ दिली नाही. मला आठवते की एकदा त्यांची नात सारिका आणि काही मुली प्रार्थनास्थळांवर उशिरा आले म्हणून मी त्यांना बसू दिले नाही . त्या नंतर मला अनेकांनी सांगितले की ही मुलगी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का ? विशेष म्हणजे दादांनी मला प्रत्यक्ष शाळेत फोन करून तुम्ही अत्यंत योग्य केले अशी शाबासकी दिली.
    दादा त्यांच्या विविध प्रकल्पातील अगदी लहानणातील लहान घटकाच्या देखील संपर्कात येतं असतं. आपुलकीने विचारपूस करत असतं. एवढ्या मोठ्या केशवस्मृती प्रकल्पातील 13 प्रकल्पातून माझ्या सारख्या माहिती नसलेल्या शिक्षकाला आवर्जून त्यांनी त्यांच्या सोबत 2 वेळा भोजनाला बोलावले. माझ्या साठी तो प्रसंग आयुष्याची मोठी शिदोरी ठरला . ऋषितुल्य व्यक्तिमत्वासोबतचा तो सहवास आयुष्याला मोठी दिशा देणारा ठरला.
    दादांना स्मरून प्रत्येकाला वाटेल,
    " दिव्यत्वाची प्रचिती जेथे, तेथे कर माझे जुळती"

    आदरणीय दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन......


    ज्ञानेश्वर पाटील
    विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव.

    ReplyDelete
  5. खरंच दादा हे मातृहदयीं च होते

    ReplyDelete
  6. Well written and let us follow path showen by DADA!!!

    ReplyDelete

३० डिसेंबर १९७५ ची ती रात्र

२६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणिबाणी ला आता जवळपास सहा महिने झाले होते. आणिबाणी म्...